ज्योती पाटलांना दिलासा; तहसीलदारांचा निर्णय
मनवेल प्रतिनिधी >> यावल तालुक्यातील थोरगव्हाण ग्रामपंचायतीच्या उपसरपंच ज्योती केवल पाटील यांच्या विरोधात दाखल केलेला अविश्वास प्रस्ताव यावलचे तहसीलदार महेश पवार यांनी फेटाळला आहे. या संदर्भात बुधवारी ग्रामपंचायत सदस्यांना पत्रक देण्यात आले. यामुळे उपसरपंच ज्योती पाटील यांना दिलासा मिळाला आहे.

थोरगव्हाण ग्रामपंचायतीच्या नऊ सदस्यांपैकी आठ सदस्यांनी उपसरपंच ज्योती पाटील यांचा विरोधात ४ डिसेंबर रोजी यावल तहसीलदारांकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. मात्र यापूर्वी २० जुलै २०१९ रोजी उपसरपंच पाटील यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव दाखल करण्यात आला होता.
तेव्हा महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम (सन १९५९ मुंबई अधिनियम क्रमांक ३)चे अंतर्गत महाराष्ट्र ग्रामपंचायत (सुधारणा) अधिनियम २०२० चे कलम ३५ मधील नुसार अविश्वास प्रस्ताव दखल करून अविश्वास आणता येणार नाही, असा नियम असल्याने उपसरपंच ज्योती पाटील यांच्याविरुद्ध दाखल केलेला अविश्वास प्रस्ताव तहसीलदार महेश पवार यांनी फेटाळला. त्यामुळे उपसरपंच पाटील यांना दिलासा मिळाला आहे.