यावल-निमगाव शिवारात बिबट्या आढळल्याने खळबळ ; सावधानता राखण्याची गरज

तापी यावल शेती

यावल प्रतिनिधी >> तालुक्यातील निमगाव शिवारात गुरूवारी पहाटे बिबट्या दिसल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शिवारात पाहणी करून बिबट्याच्या पायांचे ठसे घेतले. शेतकऱ्यांनी सतर्कता बाळगावी, अशी सूचना देण्यात आली आहे.

निमगाव येथील शेतकरी अरुण जुलालसिंग पाटील यांच्या शेतात गुरूवारी पहाटे बिबट्या दिसला. या बाबत तात्काळ यावल प्रादेशिक वनविभागास माहिती देण्यात आली. वनक्षेत्रपाल व्ही.टी.पदमोर, वनपाल आर. सी. सोनवणे, आय. एस. तडवी यांनी घटनास्थळी धाव घेतली. बिबट्याच्या पायांचे ठसे घेऊन शेतकऱ्यांना सतर्कतेची सूचना अधिकाऱ्यांनी दिली.

शेतशिवारात प्रत्येकाने दक्ष रहावे, बिबट्या दिसल्यास वनविभागास माहिती द्यावी असे अवाहन केले. बिबट्या एका रात्रीत शिकारीसाठी ३० किमी अंतरात फिरतो. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगावी, असे वनक्षेत्रपाल व्ही. टी. पदमोर यांनी सांगितले. बिबट्या दिसल्याने शेतकरी व मजुरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.