मंडळाधिकाऱ्यांना ढकलून देत सात जणांवर घातली कार, डंपर पकडल्याचा राग ; ५ जणांवर गुन्हा

क्राईम चोरी, लंपास तापी निषेध पाेलिस यावल साकळी

यावल-किनगाव प्रतिनिधी >> अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या एका डंपरला महसूलच्या पथकाने किनगावजवळ पकडले. त्यास कारवाईसाठी पोलिस ठाण्यात नेताना डंपर पळवण्याचा प्रयत्न करत महसूलच्या पथकावर कार घालून ठार मारण्याचा प्रयत्न झाला. डंपर सोडवण्यासाठी कारमधून आलेल्या इतर चौघांनी शासकीय कामात अडथळा आणला. या प्रकरणी एकूण पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी डंपरसह कार ताब्यात घेतली.

गेल्या आठवड्यात वाळू माफियांनी फैजपूर प्रांत व वाहन चालकावर हल्ला केला होता. यानंतर सोमवारी वाळू माफियांच्या दादागिरीची दुसरी घटना घडली. किनगावचे मंडळाधिकारी सचिन तुळशीराम जगताप यांनी फिर्यादी दिली. ते रविवारी रात्री ९.४५ वाजेच्या सुमारास अवैध गौणखनिज वाहतूक रोखण्यासाठी चार तलाठी आणि दोन कोतवाल असे सात जणांचे पथक गस्तीवर होते.

अंकलेश्वर-बऱ्हाणपूर राज्य मार्गावर किनगाव जवळ एमएच.१२-एफझेड-८४२५ या डंपरमधून गणेश संजय कोळी (रा.कोळन्हावी) हा अवैध वाळू वाहतूक करताना दिसला. यावेळी तिथे एएच.१९-एपी.४१२८ या क्रमांकाच्या कारमधून चालक गोपाल प्रल्हाद सोळंखे हा आला. त्याने शासकीय कामात अडथळा आणला.

शिवीगाळ करत मंडळाधिकाऱ्यांना ढकलून दिले. यानंतर पथकाने डंपर यावल पोलिस ठाण्यात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने साकळी गावाजवळ भोनक नदीच्या पात्राच्या दिशने डंपर पळवून नेण्याचा प्रयत्न केला. डंपरमध्ये बसलेले तलाठी विजय साळवे, टेमरसिंग बारेला यांना शिवीगाळ करून खाली उतरवले. तरीही महसूलच्या पथकाने हार न मानता पुन्हा डंपर पकडले. यावेळी पाळत ठेवणाऱ्यांनी महसूल पथकावर कार घालण्याचा प्रयत्न केला.

या गुन्ह्यातील डंपर (क्रमांक एमएच.१२-एफझेड.८४२५) आणि महसूल विभागाच्या पथकावर पाळत ठेवण्यासाठी वापरली जाणारी कार (क्रमांक एमएच-१९.एपी.४१२८) पोलिसांनी ताब्यात घेतली. एकूण पाच जणांविरुद्ध संचारबंदीच्या आदेशाचे उल्लंघनासह भादंवी कलम ३०७, ३५३, ३३२, ३२३, ५०४, ५०६, १८८ प्रमाणे गुन्हा दाखल केला.

याप्रकरणी गणेश संजय कोळी, गोपाळ प्रल्हाद सोळुंके, संदीप आधार सोळुंके (तिन्ही रा.कोळन्हावी ता.यावल), विशाल कोळी व छगन कोळी (दोन्ही रा.डांभुर्णी) यांच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण करत ठार मारण्याचा प्रयत्न करणे व विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला. डंपर चालक गणेश संजय कोळी याला अटक करण्यात आली. त्यास यावल न्यायालयाने ५ मार्चपर्यंत पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. तपास पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विनोद खांडबहाले करत आहेत.