हिंगोणा प्रतिनिधी >> येथील रहीवाशी असलेल्या वत्सलाबाई मनोहर वारके यांना साप चावल्याने त्यांचा मृत्यु झाला आहे.
हिंगोणा येथील रहिवासी वत्सलाबाई मनोहर वारके वय 52 ह्या दि. २ जुलै रोजी पहाटे पाऊणे पाच वाजेच्या दरम्यान चुलीवर पाणी तापवण्यासाठी उठले तसेच चूल पेटवण्यासाठी सरपण घेतले असता त्यांच्या उजव्या पायाच्या अंगठ्याला सापाने चावा घेतला.
ही बाब त्यांच्या लक्षात आल्याने त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र हिंगोणा येथे उपचारार्थ आणण्यात आले तेथे प्राथमिक उपचार करून त्यांना रुग्णवाहिकेतून यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
परंतु त्यांची प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना पुढील उपचारार्थ जळगाव येथील जिल्हा रुग्णालय येथे हलवण्यात आले. मात्र साप अती विषारी असल्यामुळे त्यांचा रस्त्यातच मृत्यू झाला. त्यामुळे त्यांचे शवविच्छेदन जिल्हा रुग्णालयात करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. या घटनेने परिसरात शोक व्यक्त केला जात आहे.