रिड जळगाव टीम >> श्रीनगरमध्ये सेनेच्या गस्ती पथकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पिंपळगावच्या ता. चाळीसगाव २२ वर्षीय जवानाला गुरुवारी दुपारी वीरमरण आले. अवघ्या विशीत हौतात्म्य आलेल्या वीरपुत्राचे वडिल दिगंबर देशमुख यांनी मन हेलावून टाकणाऱ्या भावना व्यक्त केल्या. यश सप्टेंबर महिन्यात घरी आला होता. 2 ऑक्टोबरला परत गेला. 4 दिवसांपूर्वी फोनवर बोलणं झालं होतं, कसे आहात विचारलं होतं. गुरुवारी दुपारी मला लष्करी अधिकाऱ्यांचा फोन आला. तो खूप जिद्दी होता, परिस्थितीची त्याला जाणीव होती, असं त्यांनी सांगितलं.
यश देशमुख गेल्या वर्षी मिल्ट्रीमध्ये भरती झाले होते. भारतमातेच्या रक्षणासाठी सेवा करताना दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात त्यांना हौतात्म्य आलं. ‘त्यांनी मागून हल्ला केला, पुढून केला असता तर माझ्या यशने 3 जण तरी मारले असते’ असा विश्वास पुत्राच्या शहीदीनंतर वडिलांनी व्यक्त केल्यानं सर्वांचाच उर भरून आला.
थोड्याच वेळापूर्वी शहीद जवान यश देशमुख यांचे पार्थिव चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव इथे दाखल झालं आहे. दरम्यान गावी जाणाऱ्या मार्गावर अनेक ठिकाणी फलक लावत यशला श्रद्धांजली अर्पण केली जात असून रस्त्याच्या दोन्ही बाजूला रांगोळ्या काढल्या गेल्या आहेत. गावकऱ्यांनी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत तिरंगा रॅली देखील काढली आहे.