महाजन-बढे यांच्या भेटीमुळे वरणगावचे राजकारण तापले

Politicalकट्टा कट्टा निवडणूक भुसावळ वरणगाव सिटी न्यूज

वरणगाव >> वरणगाव पालिका निवडणुकीचे पघडम वाजण्यास सुरुवात होताच पडद्याआड राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यादृष्टीने माजी मंत्री गिरीश महाजन आणि संजय सावकारे यांनी वरणगाव गाठून चंद्रकांत बढे यांची घेतलेली भेट राजकीय पटलावर लक्षवेधी ठरली आहे. ही भेट बढे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून झालेली असली तरी गेल्या काही महिन्यात शहरातील राजकीय घडामोडी पाहता भाजपने पालिका निवडणुकीसाठी आतापासूनच बेरजेचे राजकारण सुरू केल्याचे समोर आले.

निवडणूक आयोगाने वरणगाव पालिकेच्या सर्व १८ प्रभागांची प्रारूप मतदार यादी जाहीर करून निवडणूक प्रक्रियेचा श्रीगणेशा केला. या हरकतींवर सुनावणी होऊन १ मार्चला अंतिम मतदार यादी जाहीर होईल. या हालचाली पाहता राजकीय पक्षांचे पदाधिकारी ‘अॅक्टीव्ह’ झाले आहेत. वरणगाव पालिकेच्या राजकीय मैदानात भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेस हे प्रमुख स्पर्धक आहे. मात्र, ऐनवेळी पक्ष विरहित एखादी आघाडी मैदानात उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दुसरीकडे शहरातील बडे प्रस्थ असलेले चंद्रकांत हरि बढे हे देखील सक्रिय झाले आहेत. ते आपल्या समर्थकांना निवडणूक रिंगणात उतरवण्याचे संकेत आहे. मात्र, ते आघाडी करून लढतात की एखाद्या पक्षाला जवळ करतात? हे चित्र अद्याप स्पष्ट नाही. यादृष्टीने भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी चंद्रकांत बढे यांची घेतलेली भेट महत्त्वाची आहे. या भेटी विषयी चंद्रकांत बढे यांना विचारले असता, आमदार महाजन व सावकारे यांनी वाढदिवसानिमित्त भेट घेतली होती. त्याकडे राजकीयदृष्ट्या पाहू नये, असे सांगितले.