पाचोऱ्यातील तरुणाला सैन्यात नोकरीच्या बहाण्याने गंडवले

क्राईम निषेध पाचोरा सिटी न्यूज

पाचोरा ::> शहरातील कृष्णापुरी भागातील रहिवासी तरुणास सैन्यदलात भरती करून देण्याच्या बहाण्याने पुणे येथील भामट्याने ५० हजार रुपयांत गंडवले. याप्रकरणी पाचोरा पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.

नितीन शिवदास महाजन (वय २२, रा.कृष्णापुरी, पाचोरा) हा १३ जानेवारी २०२० रोजी परभणी येथे सैन्यभरतीसाठी गेला होता. शारीरिक चाचणी उत्तीर्ण झाल्यानंतर वैद्यकीय तपासणीत कान व डोळ्यांची अडचण निर्माण झाली. ही अडचण दूर करण्यासाठी आरोपी संदीप शंकर आडाव (रा. कमांडंट हॉस्पिटल, औंदा रोड, पुणे) याने नितीनला गाठले. माझी मिलिटरीमधील मोठ्या अधिकाऱ्यांसोबत ओळख आहे. तुला मेडीकलमध्ये उत्तीर्ण करून देईल, असे सांगितले.

नितीनकडून ५० हजार रुपयांची मागणी केली. त्यानुसार नितीनने त्याला पाचोरा येथून ५ फेब्रुवारी २०२० रोजी दिलेल्या बँक खात्यात ५० हजार रुपये पाठवले. यानंतर नितीन ६ फेब्रुवारीला पुणे खडकी येथील मेडिकल हॉस्पिटलमध्ये गेला. येथे त्याने संदीप आडाव यांच्या मोबाइलवर संपर्क केला. मात्र, आडावने त्याची भेट घेणे टाळले. त्यानंतर वेळोवेळी संपर्क साधून पैसे परत देण्याची मागणी केली. मात्र, आडाव याने दाद दिली नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच नितीनने पाचोरा पोलिसात आडाव याच्यावर गुन्हा दाखल केला. तपास निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.