अॅपेरिक्षाचे टायर फुटल्याने अपघात, भुसावळची आजी व नात जागीच ठार

Shirpur अपघात क्राईम धुळे माझं खान्देश

शिरपूर प्रतिनिधी ::> भाऊबीजनिमित्त मध्य प्रदेशातील ठिकरी (ता.सेंधवा) येथे अॅपेरिक्षाने जाणाऱ्या भुसावळातील नारायण नगरातील पवार कुटुंबीयांचा शिरपूरजवळ अपघात झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी ५ वाजता मुंबई-आग्रा महामार्गावर हाडाखेड (ता.शिरपूर) या गावाजवळ घडली. या अपघातात ६० वर्षीय आजी आणि एकवर्षीय नात अशा दोन जणांचा मृत्यू झाला.

पवार कुटुंबीय मंगळवारी सकाळी भुसावळातून अॅपेरिक्षाने (एमपी ४६-आर.०४१७) ठिकरीला जाण्यासाठी निघाले होते. हाडाखेड गावाजवळ अॅपेरिक्षाचा पुढील टायर फुटला. त्याचवेळी मागून येणारी आयशर ट्रक (एमएच.१८-एम.५५१०) अॅपेरिक्षावर धडकली.

या अपघातात अॅपेरिक्षातील प्रमिला नारायण पवार (वय ६०) व त्यांची नात कनिष्का नरेश पवार (वय १) यांचा मृत्यू झाला. कनिष्काचा जागीच तर प्रमिला पवार यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात वेदिका नरेश पवार (वय ४), तिची आई शीतल नरेश पवार (वय २४), जितेंद्र पवार, नारायण पवार व त्यांची मुलगी हर्षा घोगरे हे पाच जण जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच शिरपूर पोलिसांनी घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. शितल पवार यांना उपचारासाठी धुळ्याला हलवले आहे. तर अन्य जखमींवर शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आजी व नात ठार झाल्याचे समजताच भुसावळातील नारायणनगरात शोककळा पसरली. दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असतांना ही घटना घडल्याने आनंदावर विरजण पडले. भुसावळातील नातेवाइकांनी घटनास्थळी व उपजिल्हारुग्णालयात धाव घेतली.