ट्रॅक्टरच्या धडकेत एरंडोल रिंगणगाव येथील पादचारी तरुण ठार

अपघात एरंडोल क्राईम

एरंडोल >> शेतात कामाला जाणाऱ्या तरुणाला बुधवारी रात्री १ वाजेच्या सुमारास भरधाव ट्रॅक्टरने धडक दिली. रिंगणगाव शिवारातील या अपघातात ट्रॅक्टर खोल खड्ड्यात पलटी होऊन त्याखाली दाबले जावून तरुणाचा जागीच मृत्यू झाला. सचिन श्रीराम सुरसे असे मृताचे नाव आहे.

सचिन सुरसे (वय ३०, रा.रिंगणगाव ता.एरंडोल) हा बुधवारी रात्री अशोक नामदेव मते यांच्या शेतात कामासाठी निघाला होता. रात्री रिंगणगाव-विखरण रस्त्याने जाताना सचिनला ट्रॅक्टरने (क्रमांक एमएच.१९-सी.वाय.१३०८) धडक दिली. रस्त्यावरून जाणारे सचिन जगताप यांनी सचिनचा भाऊ समाधान सुरसे यांना अपघाताची माहिती दिली.

दरम्यान, अपघातानंतर ट्रॅक्टर पाटाजवळील खोल खड्ड्यात पलटी झाले. सचिन ट्रॅक्टरखाली सचिन दाबला गेला. समाधान व सचिन जगताप यांनी ग्रामस्थांच्या मदतीने त्याला ट्रॅक्टर खालून काढून एरंडोल येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र, तपासणीअंती डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. समाधान सुरसे यांच्या तक्रारीवरून ट्रॅक्टर चालक शरद आनंदा शिंदे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. तपास पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव करत आहे.