रावेर प्रतिनिधी >> महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात कार्यरत असलेल्या ५१ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जिल्हांतर्गत ७ नोव्हेंबरला बदल्या केल्या आहेत.
येथील पंचायत समितीत यावल येथून सहायक कार्यक्रम अधिकारी दिनेश अंजाळे यांची बदली झाली आहे. ते ११ तारखेला येथे हजर होण्यासाठी आले असता बीडीओ दीपाली कोतवाल यांनी त्यांना हजर करून घेतले नाही. उलट खासदार, आमदार यांच्या सांगण्यानुसार अंजाळेंना रुजू करू शकत नसल्याचे पत्र पाठवून जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश कोतवाल यांनी धुडकावला आहे. तसे रोहयोचे उप जिल्हाधिकारी प्रसाद मते यांना पत्राने कळवले. दरम्यान बीडीओ कोतवाल यांच्याशी संपर्काचा प्रयत्न केला. पण तो होऊ शकला नाही.