राष्ट्रवादीच्या नेत्याकडून राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांचा एकेरी उल्लेख करत जोरदार टीका

Jalgaon Jalgaon MIDC Politicalकट्टा कट्टा जळगाव जळगाव जिल्हा जामनेर पहूर

जळगाव प्रतिनिधी >> ‘तर मी सीडी लावेन’ असे जाहीर आव्हान भाजप नेत्यांना एकनाथ खडसे यांनी ज्या प्रफुल्ल लोढा यांच्या भरवशावर दिले होते त्या लोढा यांनीच अशी काही सीडी आपल्याकडे नाही, असे आज पत्रकारांसमोर जाहीर केले. या सीडीसाठी खडसे यांनी गृहमंत्र्यांमार्फत पोलिसांवर दबाव आणून आपल्या मित्राच्या आणि भावाच्या घराची ‘झडती’ घ्यायला लावली असून या प्रकरणी आपण उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत, असेही प्रफुल्ल लोढा यांनी पत्रकारांना सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच कार्यकर्ते असलेले जामनेर येथील प्रफुल्ल लोढा एकेकाळी आमदार गिरीश महाजन यांच्याबरोबर काम करीत होते. मात्र, नंतर ते आमदार महाजन आणि त्यांचा सहायक रामेश्वर नाईक यांचे कट्टर विरोधक झाले. त्या दोघांच्या कथित गैरकृत्याचे पुरावे आपल्याकडे आहेत, असा दावा ते करीत होते. महाजन यांच्या गैरकृत्याची सीडी लोढा यांच्याकडे आहे, असे एकनाथ खडसे यांनीही जाहीर केले होते.

भाजपवर नाराज होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करताना खडसे यांनी ‘त्यांनी ईडी लावली तर मी सीडी लावेन’ असे जाहीरपणे भाषणात सांगितले होते. तेव्हापासून ही कथित सीडी अधिक चर्चेत आली होती.

मध्यंतरी जामनेरचे माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांनी आणि जळगाव येथील अॅड. विजय पाटील यांनीही स्वतंत्रपणे पत्रकारांना ‘सीडी’ लांबून दाखवून योग्य वेळी ती प्रदर्शित करणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे ती कथित ‘सीडी’ नेमकी कोणाकडे आहे, असाही प्रश्न निर्माण झाला आहे.

आमदार महाजन आणि रामेश्वर नाईक यांच्या गैरकृत्याचे पुरावे असलेली फाईल एकदा आपण एकनाथ खडसे यांना दाखवली होती. त्याचवेळी त्यांना ती फाईल ठेवून घ्यायची होती. पण आपण त्यास नकार दिला. काही फोटो मात्र आपण त्यांना दिले आहेत, असे प्रफुल्ल लोढा यांनी आज सांगितले. ती फाईल आणि सीडी माझ्या मित्राकडे सुरक्षित आहे, असे आपण जामनेरच्या पारस ललवाणी यांना सांगितले होते.

पारस यांनी ती बाब खडसे यांना सांगितली. त्यानंतर खडसे यांनी गृहमंत्र्यांना सांगून माझ्या सिल्लोड येथील मित्राकडे, सुनिल कोचर यांच्याकडे पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस अधिकाऱ्यांना सर्च वॉरंटसह पाठवले. या पोलिसांनी २७ नोव्हेंबर रोजी सिल्लोडला कोचर यांच्या घरी तर मुंबईत आपल्या भावाच्या विधवा पत्नीच्या घरी झडती घेतली.

मुंबईतील झडतीचा पंचनामा पोलिसांनी केला, पण कोचर यांच्या घरातील झडतीचा पंचनामा केला नाही. तिथे त्यांच्या हाताला लागतील त्या सीडी आणि डीव्हीडी त्यांनी उचलून नेल्या आहेत. वास्तविक हे अधिकारी ज्या बीएचआर पतसंस्थेतील घोटाळ्याचा तपास करीत आहेत त्या बीएचआरशी सुनिल कोचर अथवा माझ्या भावाचा काहीही संबंध नाही. त्यामुळे या प्रकरणी आपण उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत, असे लोढा म्हणाले. सर्च वॉरंटच्या प्रती आणि मुंबई येथील झडतीत जप्त केलेल्या वस्तुंचा पंचनामा म्हणून काही कागद त्यांनी पत्रकारांना दाखवले.

नशेत आरोप : खडसे
एकनाथ खडसे यांना प्रतिक्रिया विचारली असता, आरोप करणारे लोढा हे दारूच्या नशेत होते आणि अशा माणसाच्या आरोपांना उत्तर देण्याची आवश्यकता वाटत नाही, असे ते म्हणाले.