प्रतिनिधी जळगाव ::> अनोळखी मोबाईल क्रमांकावरून पोलीस कर्मचारी व त्याच्या पत्नीला आलेल्या अश्लील मेसेज प्रकरणात फिर्यादी पोलीस कर्मचाऱ्याने पत्नी, आई व भावाला घेऊन थेट वावडदा येथील तरुणाचे घर गाठून दमबाजी केली. तर अधिकच्या चौकशीत ज्या क्रमांकावरून मेसेज आले आहेत, ते सिमकार्ड सहा महिन्यापूर्वीच जिल्हा पेठ पोलिसांनी मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात जप्त केले आहे.
ज्या मोबाईल क्रमांकावरून मेसेज आला तो माझाच होता व ते सिमकार्ड मैत्रिणीला दिले होते. परंतु आठ महिन्यांपूर्वी शहरातील एका महाविद्यालयात मोबाईल चोरीचे प्रकरण घडल्याने त्या गुन्ह्यात हे सीम कार्ड निष्पन्न झाले होते. त्यामुळे जिल्हा पेठ पोलिसांनी ते सीम कार्ड जप्त केले होते, असे या तरुणाने सांगितले.
त्यानंतर या कर्मचाऱ्याने तरुणाच्या मैत्रिणीचे घर गाठून तिचे संभाषण मोबाईलमध्ये रेकॉर्ड केले. त्यामुळे अशिकार नसताना चौकशी व मुलीचे संभाषण रेकॉर्डिंग केल्याने संतप्त झालेल्या नातेवाईकांनी बुधवारी सायंकाळी शहर पोलीस स्टेशन गाठून निरीक्षक अरुण निकम यांच्या कानावर हा प्रकार घातला.
मुळात तपास दुसऱ्याकडे असताना हा कर्मचारी गणवेशात तेथे गेलाच कसा? व दमबाजी का केली म्हणून या नातेवाईकांनी निरीक्षकांना जाब विचारला. गुरुवारी पुन्हा हे नातेवाईक पोलीस अधिक्षकांकडे आले होते.