पारोळ्यात बंद घरातून ४० हजारांची चोरी ; प्रमाण वाढले

क्राईम चोरी, लंपास पारोळा

पारोळा >> येथील म्हसवे शिवारातील स्वामी नारायण नगरात १५ डिसेंबरच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्याने बंद घर फोडून ४० हजारांची रक्कम लंपास केली. गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात वाहन चोरीच्या घटना वाढल्या होत्या. या पाठोपाठ चोरट्यांनी बंद घरांना लक्ष करण्यास सुरुवात केली आहे.

राहुल बापू शिंदे यांनी चोरीप्रकरणी पारोळा पोलिसांत फिर्याद दिली. त्यात त्यांच्या घराजवळील रहिवासी हितेंद्र कोतवाल हे पुणे येथील आपल्या मुलाकडे कामानिमित्त गेले होते. यामुळे त्यांचे घर बंद होते. याचा फायदा घेत चोरट्याने १५ डिसेंबरच्या मध्यरात्री घराच्या दरवाजाचे कुलूप तोडले. यानंतर आत प्रवेश करून कपाटात ठेवलेले ४० हजार रुपये चोरले.

बुधवारी सकाळी राहुल शिंदे यांना हितेंद्र कोतवाल यांच्या घराचा दरवाजा अर्धवट उघडा दिसला. त्यामुळे त्यांना चोरीची शंका आली. यानंतर त्यांनी निरखून पाहिल्यावर घराचे कुलूप भिंतीवर दिसले. यामुळे हितेंद्र कोतवाल यांना फोनद्वारे माहिती दिली. यानंतर गुन्हा दाखल झाला. तपास प्रकाश चौधरी करत आहेत.