घराच्या हिस्से वाटणीवरून पुतण्याचा काकावर चाकूने हल्ला ; उपचारादरम्यान मृत्यू

क्राईम निषेध पारोळा

पारोळा प्रतिनिधी ::> तालुक्यातील करमाड खुर्द येथे वाटणीच्या वादातून काका-पुतण्याचे भांडण झाले होते. त्यात संतप्त पुतण्याने काकाच्या पोटात चाकू खुपसला होता. या घटनेत जखमी झालेले काका उत्तम चिंतामण पाटील यांचा २७ ऑक्टोबरला रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी दाखल गुन्ह्यात खुनाचे कलम वाढवण्यात आले.

करमाड खुर्द येथील उत्तम चिंतामण पाटील (ह.मु.मोहाडी, ता.धुळे) यांचे गॅस सिलिंडर पुतण्या सोपान तुकाराम पाटील हा हॉटेल व्यवसायासाठी वापरत होता. ते मागण्यासाठी उत्तम पाटील यांनी सोपानला फोन केला. मात्र, त्याने शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिली. यानंतर उत्तम पाटील २४ ऑक्टोबरला करमाड खुर्द येथे बंधू रमेश पाटील यांच्याकडे असताना तेथे आलेला पुतण्या सोपानने त्यांच्या पोटावर चाकूने वार केला. त्यात जखमी उत्तम पाटलांवर धुळे येथील सिद्धेश्वर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. २७ ऑक्टोबरला रात्री त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, पोलिसांनी सोपान पाटील (वय १९) याला अटक केली. त्यास पोलिस कोठडी मिळाली आहे.