पाचोरा येथील शेतकऱ्याचा विजेच्या जोरदार धक्क्याने मृत्यू

क्राईम पाचोरा

पाचोरा ::> पाचोरा येथील परदेशी मीना समाजाचे तालुकाध्यक्ष तथा शेतकरी चतरसिंग नारायण परदेशी (वय ५१) हे शेतात पाणी भरण्यासाठी गेले होते. कृषीपंप सुरु करताना विजेच्या धक्क्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सकाळी ८ वाजता गिरणा नदी पात्रात घडली. पाचोरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


मूळचे आखतवाडे येथील रहिवासी असलेले व हल्ली पाचोरा येथील इंदिरा नगरात वास्तव्यास असलेले चतरसिंग परदेशी हे सकाळी ८ वाजता गिरणा नदी पात्रात कृषी पंप सुरू करण्यासाठी गेले होते. त्यांचा स्पर्श विजेच्या वायरला लागल्याने ते जागेवरच कोसळले. जवळच गिरणा नदी पात्रात मासेमरी करत असलेल्या काही जणांनी घटनेचे वृत्त त्यांच्या घरी कळविले. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली व आक्रोश केला. चतरसिंग परदेशी हे सेवानिवृत्त मुख्यध्यापक नारायण परदेशी यांचे चिरंजीव आहेत. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ, २ बहिणी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. त्यांचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अमित साळुंखे यांनी केले. पाचोरा व आखतवाड्यात या घटनेमुळे शोककळा पसरली.