पाचोरा तालुक्यात भर दिवसा घरातून चोरट्यांनी ५ लाख ७० हजारांचा ऐवज लांबवला

क्राईम चोरी, लंपास निषेध पाचोरा पाेलिस

पाचोरा प्रतिनिधी >> चिंचखेडा खुर्द (ता.पाचोरा) येथे भरदिवसा उघड्या घरात घुसून चोरट्याने सोन्याचे दागिने व रोख रक्कम मिळून तब्बल ५ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ७ डिसेंबरच्या या घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चिंचखेडा खुर्द येथील प्रकाश सीताराम पाटील यांचे रस्त्याला लागूनच घर आहे. ७ डिसेंबर घरात कुणीही नसताना चोरट्याने शिताफीने घरात प्रवेश केला.

यानंतर घरातील कपाटात ठेवलेले २० हजार रुपये रोख आणि साडेपाच लाखांचे दागिने लंपास केले. त्यात ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे २ जोड टोंगल, १० हजारांचे कॅप, २० हजारांची डोरल पोत, ७२ हजारांच्या तीन सोन्याच्या अंगठ्या, १ लाख २० हजार रुपये किमतीचा चपला हार, ४० हजारांचे मणी मंगळसूत्र, ३६ हजारांच्या दोन जोड बाळ्या, २० हजारांची अंगठी, १२ हजारांचा कानातील एक जोड या मुद्देमालाचा समावेश आहे.

तसेच घरातीलच एका छोट्या लेदर बॅगेत ठेवलेली सोन्याची एक चैन, एक नेकलेस व दोन अंगठ्या, एक सोन्याची कॅप व ३ हजार रुपये रोख मिळून आले आहेत. सोमवारी सायंकाळी घरात चोरी झाल्याचे प्रकाश पाटील यांच्या लक्षात आले. यामुळे त्यांनी पाचोरा पोलिसांत अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. तपास उपनिरीक्षक गणेश चौबे करत आहे.