पाचोऱ्यातील भाजपचे पोस्टरबाजीतून सत्ताधारी सेनेला राजकीय ‘शालजोडे’

Politicalकट्टा कट्टा पाचोरा

पाचोरा प्रतिनिधी ::> आमदारांच्या नेतृत्वाखालील पाचोरा पालिकेच्या भोंगळ कारभाराने पाचोरा शहरवासी त्रस्त झाल्याचा आरोप करत, बुधवारी भाजप पदाधिकाऱ्यांनी ‘होय करून दाखवलं’ या शीर्षकाखाली व्यंगात्मक पोस्टरबाजी करत शिवसेनेला चिमटे काढले.

शहरातील प्रमुख रस्त्यांच्या कामामुळे कुठेही पर्यायी व्यवस्था व नियोजन नसल्याने नागरिकांना कोरोनाकाळात तासनतास वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागते. पावसाने रस्त्यांवरील खड्डे व भुयारी मार्गात पाणी साचले. परिणामी शहरवासीयांना आता बोटिंगचा आनंद घेण्यासाठी गोवा किंवा कोकणात जाण्याची गरज नाही.

या सर्व प्रकाराला पालिका व तालुक्याचे आमदार जबाबदार असल्याचा आरोप करून भाजपने विविध कॉलन्यांमध्ये उपरोधात्मक पोस्टर लावले. सोबतच निकृष्ट रस्ते, शहरातील अस्वच्छता या मुद्द्यांवर देखील पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेवर टीका केली.

यानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी गांधीगिरी करत शिवसेनेचे नगराध्यक्ष संजय गोहील यांचा सत्कार करण्यासाठी पालिका गाठली. मात्र, नगराध्यक्षांचे दालन बंद होते. यामुळे या दालनाच्या प्रवेशद्वारालाच पुष्पहार घालून व श्रीफळ ठेवले. आभारपत्र चिकटवले.

तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात भाजप शहराध्यक्ष रमेश वाणी, दीपक माने, गोविंद शेलार, संजय पाटील, समाधान पाटील, भय्या ठाकूर, कुमार खेळकर, वीरेंद्र चौधरी, जगदीश पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते किशोर संचेती, रमेश शामनानी उपस्थित होते.

भाजपला चांगली कामे पहावत नाही : नगराध्यक्ष
गेल्या अनेक वर्षांत झाली नाहीत, एवढी कामे अलिकडे पाचोरा शहरात आमदार किशोर पाटील यांचे नेतृत्व व सत्ताधारी नगरसेवकांच्या सहकार्याने झाली. पावसामुळे कामे करताना थोडा विलंब व नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. मात्र, शहर विकासाची ही कामे भाजप पदाधिकाऱ्यांना सहन होत नाही. कोरोना काळातही ते केवळ राजकारण करत आहेत. – संजय गोहील, नगराध्यक्ष, पाचोरा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *