जिल्ह्यात भारत-ऑस्ट्रेलिया क्रिकेट मॅचवर लाखोंचा सट्टा

क्राईम जळगाव जिल्हा भुसावळ

जळगाव प्रतिनिधी >> शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सट्ट्याचा व्यवसाय तेजीत आहे. सध्या भारत व ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या कसोटी क्रिकेटवर देखील लाखो रुपयांचा ऑनलाइन सट्टा लावला जात आहे.

या प्रकारात सट्टा लावणाऱ्याने जितके पैसे लावले तितकेच पैसे त्याला जिंकल्यावर मिळतात. सामन्यातील प्रत्येक चौकार, गोलंदाज आणि फलंदाज यांची कामगिरी अशा बाबींवर सट्टा घेतला जातो. ५० हजारांपासून पुढील रकमेचा ऑनलाइन सट्टा लावला जातो. सट्टा घेणारे मोबाइलवर नोंद घेतात. त्यासाठी सट्टा घेताना संबंधिताचा कॉल रेकॉर्ड केला जातो. सट्टा लावणाऱ्याने किती रूपयांचा सट्टा लावला, कोणत्या बॉलवर आणि कोणत्या खेळाडूवर सट्टा लावला याचा हा पुरावा असतो. आकडे घेणाऱ्याकडे १२ पेक्षा अधिक लोक कामाला असतात. त्यांच्याकडे आकडे नोंदवण्याचे काम असते. अशाप्रकारे सट्ट्याचा व्यवसाय चालवला जातो.

प्रसिद्ध लग्नावरही लावले जातात पैसे
सट्टा लावणारे शौकीन कशावरही सट्टा लावतात. एखाद्या प्रसिद्ध लग्नात किती लोक येतील, किती वाजता लग्न लागेल यावरदेखील हजारो रूपयांचा सट्टा लावला जातो, अशी माहिती सूत्रांनी दिली.