नवापुरात डंपर अन् दुचाकी अपघात; एक जागीच ठार, एक गंभीर जखमी

अपघात क्राईम नंदुरबार नवापूर माझं खान्देश

नवापूर प्रतिनिधी ::> सुरतकडून येणाऱ्या मोटारसायकलला डंपरने दिलेल्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी सकाळी ११ वाजता नवापूरजवळील मानस हॉटेलजवळ घडली. परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना मदत केली. काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून वाहतूक सुरळीत केली.

सुरत येथे व्यवसाय वास्तव्यास असणारे दीपक भीमसिंग गिरासे आणि देवसिंग कोमल गिरासे दिवाळीनिमित्त शिंदखेडा तालुक्यातील कडगावला दुचाकीने (जीजे- ०५०, डीएच-२८००) जात असताना डंपरने (सीजे- ४, एमसी ९१४६) धडक दिली. यात देवसिंग गिरासे उर्फ देवा यांचा जागीच मृत्यू झाला. तर सोबत असलेले दीपक गिरासे हे गंभीर जखमी असून, त्यांना नवापूर उपजिल्हा रुग्णालयात २०८ रुग्णवाहिकेने दाखल करण्यात आले. देवसिंग गिरासे यांच्यावर नवापूर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून त्यांचे शव नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. यासंदर्भात नवापूर पोलिस ठाण्यात डंपर चालकावर गुन्हा दाखल झाला आहे. नवापूर पोलिस पुढील तपास करीत आहेत.

दिवाळीत नवापूर तालुक्यात अपघाताची मालिका सुरूच आहे. रविवारी दुपारी नवापूरहून देवदर्शनासाठी देवमोगरा येथे जात असताना नवापूर सीमा तपासणी नाक्यावर कारचे टायर फुटल्याने अपघात झाला. यात आठ जण जखमी झाले होते. या आठवड्यात दररोज छोटेमोठे अपघात होत आहेत. एका आठवड्यात चार जणांचा मृत्यू झाला आहे तर दहा जणांना गंभीर दुखापत झाली आहे. नवापूर तालुक्यातून लवकरच चौपदरीकरणाचे काम सुरू करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.