मुक्ताईनगरजवळ कार-ओमनीच्या अपघात ; चालकासह सात मजूर जखमी

अपघात क्राईम मुक्ताईनगर

मुक्ताईनगर >> शहरापासून जवळ मुक्ताईनगर ते मलकापूर रोडवरील रक्षा पेट्रोल पंपाजवळ रस्त्याच्या बाजूला उभ्या ओमनी गाडीला मलकापूरकडून येणाऱ्या स्विफ्ट कारने मागून जोरदार धडक दिली. रविवारी दुपारी झालेल्या या अपघातात मजूर व चालक मिळून ७ जण जखमी झाले.

तालुक्यातील डोलारखेडा येथील गुलाब पाव्हन इंगळे यांनी शेती कामासाठी तसेच मजुरांना ने-आण करण्यासाठी ओमनी गाडी घेतली आहे. रविवारी ते आपल्या गाडीत त्यांच्या शेतातील कामासाठी चंद्रभागा पाव्हन इंगळे, यशोदाबाई समाधान वानखेडे, भावेश समाधान वानखेडे, सविताबाई राजू वानखेडे, इंदुबाई तुळशीराम इंगळे, रमाबाई रामदास इंगळे, सर्व रा. डोलारखेडा या सहा मजुरांसह गाडीत कपाशीचे गाठोडे घेवून महामार्गावरून डोलारखेडा येथून मुक्ताईनगर येथे निघाले होते.

मलकापूर ते मुक्ताईनगर रोड महामार्गावरील रक्षा पेट्रोल पंपाच्या अलीकडे ५०० मीटर अंतरावर गुलाब इंगळे यांनी ओमनी गाडी रस्त्याच्या बाजूला थांबवली होती. तेवढ्यात मागून लाल रंगाच्या स्विफ्ट कारने उभ्या असलेल्या ओमनी गाडीला मागून जोरदार धडक दिल्याने ती जोरदार पुढे जाऊन उलटली. यात ओमनी गाडीच्या चालकासह सहा जण व कारचा चालक असे मिळून सात जण जखमी झाले. सुदैवाने जीवितहानी न झाल्याने अनर्थ टळला.

सर्व जखमींना तातडीने जळगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृतीही स्थिर आहे. या प्रकरणी गुलाब इंगळे यांचे फिर्यादीवरुन स्विफ्ट कारचालक सैफ अन्सारी अब्बास अन्सारी रा. गुलजारनगर भिवंडी, जि.ठाणे याच्याविरुद्ध येथील पोलिसांत गुन्हा दाखल झाला. तपास हवालदार श्रावण जवरे करत आहेत.