चाळीसगाव ते औरंगाबाद रेल्वेचे पुन्हा सर्वेक्षण करा : खा. उन्मेष पाटील यांची लोकसभेत मागणी

Politicalकट्टा कट्टा चाळीसगाव

चाळीसगाव राज देवरे ::> चाळीसगाव ते औरंगाबाद रेल्वे मार्ग जवळपास ९३ किलोमीटर लांब असून सन २०१७/१८ या वर्षी या रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण करण्यात आले होते. १६९० कोटी रुपये खर्चून हा रेल्वे मार्ग साकारला जाणार होता. मात्र, या योजनेसाठी लागणाऱ्या निधीच्या परतीचा दराबाबत रेल्वे प्रशासनाने नकारात्मक अहवाल दिल्याने संबंधित रेल्वे मार्ग प्रस्तावास स्थगिती दिली होती. याबाबत १६ सप्टेंबरला खासदार उन्मेष पाटील यांनी पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहात नियम ३७७ अंतर्गत हा मुद्दा मांडून औरंगाबाद -चाळीसगाव रेल्वे मार्गाचे पुन्हा सर्वेक्षण करावे, अशी मागणी केली.

महाराष्ट्राच्या आर्थिक विकासात मदत करणाऱ्या व जागतिक वारसास्थळ असलेल्या अजिंठा व वेरुळ या ऐतिहासिक पर्यटनस्थळांना या रेल्वे मार्गामुळे जोडणे शक्य होईल. यासाठी रेल्वे मार्ग लवकर व्हावा, यासाठी पुन्हा सर्वेक्षण करावे, अशी मागणी खासदार पाटील यांनी लोकसभेत केली. रेल्वे मार्गाचे खान्देशास अधिक फायदे अाहेत. सध्या चाळीसगाव येथून मनमाडमार्गे औरंगाबाद जाताना १३० किलोमीटरचा रेल्वे प्रवास करावा लागतो. मात्र, नव्या रेल्वे मार्गात चाळीसगाव ते औरंगाबाद हे अंतर अवघे ९० किलोमीटर राहिल. यामुळे ५० किलोमीटर अंतर कमी होणार आहे. या रेल्वे मार्गावर चाळीसगाव, रांजणगाव, पाथर्डी, कन्नड बोगदा, बहिरगाव, टापरगाव, देवाळाणा, वरझडी, दौलताबाद, औरंगाबाद असे रेल्वे थांबे नियोजित असून या मार्गात ११ किलोमीटरचा बोगदा असल्याचे यापूर्वीच्या सर्वेक्षणात नमूद केले आहे.

राेजगार निर्मिती हाेणार
चाळीसगाव ते औरंगाबाद रेल्वे मार्गाची घोषणा झाल्यापासून हा प्रस्ताव प्रत्यक्ष मार्गी लागावा, यासाठी खासदार पाटील यांचा पाठपुरावा सुरू आहे. या रेल्वे मार्गामुळे आर्थिक विकास आणि रोजगार निर्मितीच्या दृष्टीने मोठे योगदान राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *