जळगाव >> महाविकास आघाडीवर १०० कोटींची सुपारी घेतल्याचा आरोप करणाऱ्या आमदार सुरेश भोळेंमुळेच सागर पार्कच्या विकासाचे काम ठप्प पडले होते. वकिलांची नार्काटेस्ट करण्यापेक्षा आमदार भोळेंचीच नार्काटेस्ट केल्यास सागरपार्क, वॉटर ग्रेस आणि जागांच्या आरक्षणातील आर्थिक घोटाळे बाहेर, येतील असा गंभीर आरोप शिवसेनेचे नगरसेवक नितीन बरडे व अनंत जोशी यांनी पत्रकार परिषदेत केला.
आमदार सुरेश भोळे यांनी सागर पार्कच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर आरोप केल्यानंतर आता शिवसेना व भाजपत शाब्दिक युद्ध पेटले आहे. शिवसेनेच्यावतीने आमदार भोळे यांना लक्ष करत थेट सागरपार्कच्या विकास कामाला ब्रेक लावल्याचा आरोप केला.
सागर पार्क या जागेचा निकाल पालिकेकडून लागला असून राज्य शासनाने पाच कोटींच्या विशेष निधीतून ५७ लाख रूपये मंजूर केले आहेत. सन २०१७ मध्ये मंजुरी मिळाल्यानंतरही ते काम आजपर्यंत पूर्ण न होण्यास केवळ आमदार भोळे जबाबादर आहेत.
मंत्रालयापासून ते महापालिकेपर्यंत सर्वांना त्यांनी काम सुरू न करण्याच्या सूचना केल्या होत्या. महापालिकेचे तत्कालिन शहर अभियंता सुनील भोळे यांनीच सेवानिवृत्तीपूर्वी ही माहिती दिल्याचे नगरसेवक जोशी यांनी पत्रकारांना सांगितले.
शिवाजीनगरातील जागेवरून आमदार भोळेंनी शहरातील वकिलांची नार्काटेस्ट करण्याची मागणी केली; परंतु सागरपार्कच्या कामाला विलंब, वॉटरग्रेस तसेच शहरातील जागा असे अनेक विषय भोळेंशी संबंधित आहेत.
आमदार भोळे यांचीच नार्काटेस्ट केल्यास वॉटर ग्रेसमध्ये कोणी किती पैसे घेतले त्यांची नावे समोर येतील, असा दावा नगरसेवक बरडेंनी केला. सागर पार्कचा विकास होऊ न देण्यामागे आमदार भोळेंचा काय हेतू होता, हे सर्वश्रृत आहे.
एकीकडे विकासाच्या गप्पा आणि दुसरीकडे कामांना ब्रेक लावणे अशी दुटप्पी भूमिका आमदारांकडून बजावली जात असल्याचा आरोप शिवसेनेचे नगरसेवक जोशी व बरडे यांनी केला आहे. या वेळी पत्रकर परिषदेला नगरसेवक प्रशांत नाईक यांचीदेखील उपस्थिती होती.
महापालिकेने नागरिकांना विश्वासात घेणे गरजेचे
सागर पार्क ही शहरातील मोक्याची जागा आहे. त्या ठिकाणी सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय व धार्मिक कार्यक्रम होतात. अनेक क्रीडा स्पर्धांचे आयोजन होते. ट्रॅकमुळे अडचण येण्याची शक्यता स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे पालिकेने नागरिकांना विश्वासात घेऊन काम पूर्ण करावे हीच अपेक्षा आहे. त्यात काम थांबवणे हा उद्देश मुळीच नाही. – सुरेश भोळे, आमदार