Jalgaon News : खासगी “लॅब’ला चाचणीसाठी परवानगी द्या : आमदार गिरीश महाजन

Jalgaon Politicalकट्टा कट्टा जळगाव

जळगाव > “कोरोना’ संशयित रुग्णाचा “स्वॅब’ अहवाल येण्यास तब्बल सहा ते सात दिवस लागतात. या काळात “पॉझिटिव्ह’ रुग्णाचा अनेकांशी संपर्क येतो. त्यामुळे रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे अहवाल तातडीने मिळण्यासाठी खासगी लॅबला चाचणीसाठी परवानगी देण्यात यावी, अशी मागणी भाजप नेते व माजी मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे. याबाबत आपण मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनाही पत्र लिहिल्याचे त्यांनी सांगितले.

कोरोना’ संसर्ग जळगाव जिल्ह्यासह राज्यात वाढत आहे. जळगाव जिल्हा तर “हॉटस्पॉट’ होण्याच्या मार्गावर आहे. याबाबत चिंता व्यक्त करून ते म्हणाले, की रुग्ण “पॉझिटिव्ह’ आढळल्यानंतर प्रशासनासह सर्वांचीच धावपळ सुरू होते. या काळात त्याच्या संपर्कातील व्यक्तींना “क्वॉरंटाइन’ केले जाते. केवळ अहवाल विलंबामुळेच हे होत आहे. आज शासनाच्या सर्वच “लॅब’वर तपासणीची गर्दी आहे. त्यामुळे त्यांच्याकडून अहवालही ताबडतोब मिळू शकत नाही. त्यामुळे शासनाने ताबडतोब खासगी लॅबला चाचणीसाठी परवानगी देणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे या लॅब सवलतीच्या दरात तपासणी करून देण्यास तयार आहे. खासगी लॅबला परवानगी दिल्यास शासकीय लॅबवर असलेला ताण कमी होईल.

तर रुग्णसंख्या आटोक्‍यात येईल
जिल्ह्यासह राज्यातील “कोरोना’ रुग्णांच्या वाढत्या संख्येबाबत आपण राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र दिले आहे. राज्यातील रुग्णसंख्या कमी करून तातडीने उपाय होण्यासाठी खासगी लॅबला तपासणीची परवानगी द्यावी, अशी विनंती त्यांना केली आहे. मात्र, त्याबाबत त्यांनी अद्यापही निर्णय घेतलेला नाही. जर त्यांनी ताबडतोब निर्णय घेतला तर राज्यात ही रुग्णसंख्या आटोक्‍यात येईल, असा विश्‍वास आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *