एक कोटीसाठी विवाहितेचा छळ

Shirpur क्राईम धुळे निषेध माझं खान्देश

शिरपूर प्रतिनिधी >> तालुक्यातील खर्दे येथील माहेर असलेल्या विवाहितेला नाशिक येथील सासरच्या मंडळींनी बेदम मारहाण केली. मुंबईला फ्लॅट घेण्यासाठी माहेरून एक कोटी रुपये आणावे असा तगादा विवाहितेकडे लावण्यात आला होता. याप्रकरणी विवाहितेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार पतीसह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील खर्दे येथील माहेर असलेल्या मनीषा पवन मोरे यांचा सन २०१८ मध्ये नाशिक शहरातील सातपूर भागात राहणाऱ्या पवन खंडू मोरे यांच्याशी विवाह झाला होता. विवाह झाल्यापासूनच सासरी त्रास दिला जात होता. विवाहाच्या वेळी वडिलांनी सोन्याच्या दागिन्यांसह जवळपास चार लाख रुपये दिले होते.

विवाहानंतर मनीषा नाशिक येथे पतीसह सासरे खंडू फकिरा मोरे, सासू हिराबाई खंडू मोरे, नणंद उज्ज्वला खंडू मोरे यांच्यासह राहत होत्या. त्यांचे पती पवन मोरे हे मुंबई येथे खासगी कंपनीत इंजिनिअर आहे. ते शनिवारी व रविवारी नाशिक येथे येत असत. त्या वेळी त्यांना सासरे खंडू फकिरा मोरे, नणंद उज्ज्वला खंडू मोरे चिथवायचे. तसेच मारहाण व शिवीगाळ करून शारीरिक व मानसिक छळ करायचे.

मुंबई येथे फ्लॅट घेण्यासाठी माहेरुन एक कोटी रुपये आणावे यासाठी त्यांच्याकडे तगादा लावला जात होता. मुलगी झाल्यावरही मनीषा यांच्या चारित्र्यावर संशय घेतला जात होता. त्यामुळे मनीषा मोरे मुलीसह खर्दे येथे आल्या. या ठिकाणी १९ नोव्हेंबरला पवन खंडू मोरे, खंडू फकिरा मोरे, उज्ज्वला खंडू मोरे, सारिका उमेश शिलावट हे आले. त्यांनी मनीषाच्या आई-वडिलांकडून फ्लॅट घेण्यासाठी एक कोटी रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास फारकती देण्याची धमकी दिली.

तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. जखमी झालेल्या मनीषावर धुळे जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. या प्रकरणी मनीषा मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचे पती पवन खंडू मोरे, सासरे खंडू फकिरा मोरे, नणंद उज्ज्वला खंडू मोरे व सारिका उमेश शिलावट यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.