प्रेमविवाहाला कुटुंबीयांनी नकार दिल्याने प्रेमीयुगुलाने घेतले विष

Jalgaon आत्महत्या क्राईम जळगाव जळगाव जिल्हा

जळगाव प्रतिनिधी >> मोठ्या बहिणीच्या दिरावर दीड वर्षांपासून प्रेम जडले. पण त्याची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने कुटुंबीयांनी प्रेमविवाहाला नकार दिला. त्यामुळे युवतीसह युवकाने १९ जानेवारी रोजी ममुराबाद शिवारातील शेतात दुपारी दीड वाजता विषारी द्रव प्राशन केले. त्यात ब्रेनडेड झालेल्या युवतीचा उपचारादरम्यान रविवारी सकाळी सव्वाआठ वाजता रुग्णालयात मृत्यू झाला. युवकाचे प्राण वाचवण्यात यश आले आहे.

मोहिनी निंबा कोळी (वय २२, रा. इंदिरानगर, ममुराबाद) असे मृत युवतीचे नाव आहे. समाधान दगडू सैंदाणे (वय २५, रा. पिंगळवाडे, ता. अमळनेर) असे विष प्राशन केल्यानंतर बचावलेल्या युवकाचे नाव आहे. १९ जानेवारी रोजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास मोहिनी हिने ममुराबाद परिसरातील शेतातून लहान बहीण पूजाला फोन केला होता. समाधान व तिने विष घेतले असल्याचे सांगून पिण्यासाठी पाणी घेऊन तिला शेतात बोलावले. पूजा ही दुसऱ्या शेतात मजुरीचे काम करीत होती.

तिच्यासह वडील निंबा कोळी व नातेवाईक शेतात गेले. ममुराबाद परिसरातील शेतात म्हाळसादेवीच्या मंदिराजवळ दोघे विष प्राशन केल्यानंतर बेशुद्ध पडलेले होते. त्यांच्याजवळ विषारी औषधाच्या दोन बाटल्या पडलेल्या होत्या. निंबा कोळी यांनी त्यांच्या मुलीला स्वत:च्या रिक्षाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. समाधानला राकेश वाणी यांच्या रिक्षात आणून रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात आणत असताना तंबाखू खाल्ल्याने समाधानला उलटी झाली. त्यामुळे त्याच्या पोटातील विष काही प्रमाणात बाहेर पडले होते. मोहिनी ही बेशुद्धावस्थेत होती. तिची प्रकृती गंभीर होती. दोघांवरही शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. समाधानची प्रकृती स्थिर असल्याने शुक्रवारी त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. मोहिनीची प्रकृती अधिकच गंभीर होत ती ब्रेनडेडच्या अवस्थेत पोहोचली. अखेर सहा दिवसांनी रविवारी सकाळी ८ वाजून ५ मिनिटांनी तिचा मृत्यू झाला. याबाबत शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप पाटील यांनी दिलेल्या माहितीवरून तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बहिणीवर खरेच प्रेम होते तर तो वाचला कसा? : दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. त्यासाठी त्यांनी विष प्राशन केले. माझ्या बहिणीने जास्त प्रमाणात विष प्राशन केल्यामुळे तिचा मृत्यू झाला. आम्ही शेतात गेलो असताना बहीण मोहिनी ही बेशुद्धावस्थेत होती. समाधानने बेशुद्ध होण्याचे नाटक केले. त्याचे माझ्या बहिणीवर खरे प्रेम होते तर तो वाचला कसा? असा सवाल मृत मोहिनीची लहान बहीण पूजाने माध्यम प्रतिनिधींशी बोलताना उपस्थित केला.

कीटकनाशक विक्रेत्याला आला होता संशय : समाधानने ममुराबाद येथील आदिनाथ कृषी केंद्रावरून कीटकनाशकाच्या ५४० रुपये किमतीच्या दोन बाटल्या खरेदी केल्या होत्या. ममुराबाद गावात आधी बघितले नसल्याने कृषी केंद्र चालकाने त्याला हटकले. मावशीकडे आलो असल्याचे सांगितल्यानंतर त्याला कीटकनाशकाच्या बाटल्या देण्यात आल्याची माहिती मिळाली.

दोघांनी विष प्राशन केल्यानंतर तालुका पोलिसांनी समाधानचा जबाब घेतला. त्या दोघांचे दीड वर्षांपासून एकमेकांवर प्रेम होते. युवतीच्या वडिलांनी लग्न करण्यास नकार दिल्याने दोघांनी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा निर्णय घेतल्याचे समाधानने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले आहे. मोहिनीच्या विवाहाची कुटुंबीयांनी तयारी सुरू केली होती. तिला बघण्यासाठी रविवारी एक युवक येणार होता. समाधानची आर्थिक परिस्थिती गरिबीची आहे. मुलीचा विवाह चांगली आर्थिक परिस्थिती असलेल्या युवकासोबत करण्याचा कुटुंबीयांचा आग्रह होता. बारावीपर्यंतच्या शिक्षणानंतर मोहिनी ही घरीच राहत होती.