जिल्ह्यासह खान्देशातील २२ बेरोजगारांना नोकरीच्या बहाण्याने ६० लाखांची फसवणूक

Shirpur क्राईम माझं खान्देश साक्री

पाचोरा प्रतिनिधी >> तालुक्यातील नगरदेवळ्यासह नाशिक, साक्री, सटाणा, शिरपूर येथील २० ते २२ बेरोजगार युवकांना लष्कर, रेल्वे, वन विभाग व सीआरपीएफमध्ये नोकरीस लावून देण्याच्या बहाण्याने ६० लाखांच्या फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी नगरदेवळा येथील रहिवासी मुख्य आरोपी तथा सीआरपीएफ दलातील अधिकाऱ्याचा भाऊ सुरेश ईश्वर बागुल व अजय संजीव देशमुख या दोघांना पाचोरा पोलिसांनी ३ डिसेंबरला गावातून अटक केली.

नगरदेवळा येथील रहिवासी व बिलासपूर येथे सीआरपीएफ दलात कार्यरत रमेश ईश्वर बागुल याने दोन साथीदारांच्या मदतीने २० ते २२ तरुणांची सुमारे ६० लाखात फसवणूक केली.

याप्रकरणी रवींद्र नारायण पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल आहे. तपासासाठी पोलिस उपनिरीक्षक विकास पाटील यांनी पथकासह सिकंदराबाद गाठले. तेथे तीन दिवसांच्या परिश्रमानंतर बेतापुडी राकेश बाबू यास पकडले.

यानंतर मुख्य आरोपी रमेश बागूल याचे तीन-चार सिमकार्ड तपासल्यावर तो नाशिक येथील घरी सुटीवर आल्याचा सुगावा लागला. यानंतर पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी मिळाली.

यावेळी त्याने फसवणुकीतून मिळालेले पैसे कुणाच्या खात्यावर जमा केले? ही माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी रमेशचा भाऊ सुरेश ईश्वर बागुल व अजय संजीव देशमुख यांना ताब्यात घेत गुन्हा दाखल केला.

याप्रकरणी आतापर्यंत एकुण ५ जणांविरुद्ध गुन्हे दाखल होत सुमारे पावणेचार लाख रुपये वसूल केले आहेत.