जळगावात सुसाट कार झाडावर धडकताच एअर बॅग उघडली, तिघे वाचले

Jalgaon Jalgaon MIDC अपघात क्राईम जळगाव जळगाव जिल्हा

जळगाव प्रतिनिधी >> शहरातील काव्यरत्नावली चौकात शुक्रवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास भरधाव कार झाडावर धडकून अपघात झाला. अपघातानंतर एअरबॅग उघडल्याने चालकासह कारमधील तरुण बचावले. नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असल्याचे कारचालक युवकाच्या वडिलांनी माध्यमांना सांगितले.

नंदनवन कॉलनीतील रक्षण हिंगोणेकर हा युवक फोटोग्राफीचा व्यवसाय करतो. काव्यरत्नावली चौकात एचडीएफसी बँकेच्या बाजुला त्याचे दुकान आहे. गुरुवारी रात्री उशीरापर्यंत काम सुरू होते. त्यानंतर शुक्रवारी पहाटे तो दोन ते तीन मित्रांसोबत कार घेऊन आला होता. रक्षण हा मित्रांसोबत एम. एच. १९ सी.झेड. १५३२ या क्रमांकाच्या कारमध्ये येत असताना एचडीएफसी बँकेजवळ त्याचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर भरधाव कार समोरील झाडावर आदळली.

या अपघातानंतर कारमधील एअर बॅग उघडली. त्यामुळे रक्षणसह त्याचे मित्र बचावले. कुणालाही दुखापत झाली नाही. धडक इतकी जोरदार होती की त्या झाडाची फांदी तुटून कारवर पडली. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर मोठा आवाज झाला. त्यामुळे मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांनी घटनास्थळावर गर्दी केली. महापालिका कर्मचारीही घटनास्थळी पोहोचले.

कर्मचाऱ्यांनी झाडाची फांदी बाजूला केली. खासगी क्रेनने कार रस्त्याच्या बाजूला केली. दोन महिन्यांपूर्वीच त्याचे वडील आर. बी.हिंगोणेकर यांनी कार खरेदी केली आहे. मुलगा रक्षणला त्याचा मित्र कार शिकवत असताना हा अपघात घडल्याचे हिंगोणेकर यांनी माध्यम प्रतिनिधींना सांगितले.