अयोध्येतील श्रीराम मंदिर आंदोलनावेळी संतांनी आवाहन केले त्या-त्या वेळी समाजाने एकत्रित येत आंदोलन यशस्वी केले

Social कट्टा कट्टा तापी भुसावळ

भुसावळ प्रतिनिधी >> जेव्हा धर्मावर आक्रमण झाले तेव्हा संतांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन समाज पुढे आला आणि बलिदान केले. या पुढे होणाऱ्या प्रत्येक धर्मकार्यात संत तन, मन व धनाने पुढे राहतील, अशी ग्वाही महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज यांनी दिली. मंगळवारी राम मंदिर निर्माण निधी संकलन केंद्राचे जामनेररोडवर उद्घाटन झाले, त्यावेळी ते बोलत होते.

व्यासपीठावर भक्तीप्रसाददास महाराज, सिंधू दीदी, गोपाळ चैतन्य महाराज, हरणे महाराज, विहिंपचे जिल्हा मंत्री योगेश भंगाळे, शहराध्यक्ष श्रीकांत लाहोटी, बजरंग दलाचे जिल्हा संयोजक विक्की भिडे, सहसंयोजक गोपी राजपूत, विनोद उबाळे उपस्थित होते. अयोध्येतील भव्य राम मंदिर निर्माण करण्यासाठी विहिंप १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान देशभरात संपर्क अभिमान राबवणार असून त्या निधीतून राम मंदिराचे निर्माण होणार आहे. त्या साठी येथे निधी संकलन कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. राम मंदिर आंदोलनात संतांनी आवाहन केले त्या-त्या वेळी समाजाने एकत्र येऊन आंदोलन यशस्वी केले. हा देश बलिदानाने सुरक्षित आहे, असेही जनार्दन हरि महाराज म्हणाले.