जळगाव >> शेतमालक छोट्या कारणांवरुन शिवीगाळ करून मारहाण करीत होता. त्याचप्रमाणे बैलजोडी चोरल्याच्या संशयावरुन त्रास देऊन मजुरास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुरुवारी रात्री शेतमालकाविरुद्ध रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोविंदा श्रावण बारी (रा.बारीवाडा, रथचौक पिंप्राळा) यांचा मृतदेह ११ ऑक्टोबर रोजी पिंप्राळा येथील शेतात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला होता. ते शेतमालक नीलेश लक्ष्मीनारायण दुबे (रा.पिंप्राळा) यांच्याकडे कामाला होते.
या प्रकरणी मृत गोविंदा याच्या पत्नीने रामानंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. १० ऑक्टोबर रोजी दूध सांडण्याच्या कारणावरुन शेतमालकाने शिवीगाळ करून मारहाण केल्याचे पती गोविंदा यांनी सांगितले होते.
काम व्यवस्थित केले नाही तर जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्या दिवशी पतीला शिवीगाळ करून जबरदस्तीने कामावर नेले. त्या दिवशी पती घरी न आल्यामुळे कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला.
११ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास बारी यांचा मृतदेह शेतात झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.