जळगाव ::> कारागृहात झालेल्या मारहाणीत चिन्याचा मृत्यू झाला आहे. ती मारहाण कारागृह अधीक्षकांनी केल्याबाबचा जबाब मृत चिन्या जगतापच्या पत्नीने नशिराबाद पोलिसांना दिला आहे.
कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या रवींद्र उर्फ चिन्या जगताप याचा ११ सप्टेंबर रोजी संशयास्पदरित्या मृत्यू झाला आहे. कारागृहातून त्याला डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात मृत स्थितीत दाखल करण्यात आले होते. त्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नसल्याबाबत तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नशिराबाद पोलिसांना कळवले होते.
घटनेच्या दिवशी मृत चिन्याची पत्नी टिनाबाई जगताप यांनी त्याचा कारागृहात करण्यात आलेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा आरोप केला होता. चिन्याच्या मृत्यू प्रकरणात नशिराबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे.
नशिराबाद पोलिस त्याबाबत तपास करीत आहेत. त्या अनुषंगाने शुक्रवारी पोलिसांनी टिनाबाईला जबाब देण्यासाठी बोलावले होते. त्यावेळी त्यांनी पतीचा कारागृहात केलेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याबाबत सविस्तर जबाब दिला आहे.