जिल्हा रुग्णालयात नोकरीचे आमिष दाखवून पैसे लुटणारा मास्टरमाइंड अटकेत

Jalgaon क्राईम जळगाव निषेध पाेलिस

जळगाव प्रतिनिधी >> जिल्हा सामान्य रुग्णालयात नोकरी लावून देतो असे, आमीष देत शहरासह जिल्ह्यातील तरुणांची लाखो रुपयांत फसवणूक झाली होती.

गेल्यावर्षी १२ ऑक्टोबर २०१९ रेाजी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील फरार असलेला प्रमुख संशयीत योगेश सुधाकर पाटील (मूळ रा. नाडगाव ता. बोदवड, हल्ली मुक्काम अंकलेश्‍वर, गुजरात) यास जिल्हापेठ पोलिसांनी भरुच येथून सापळा रचून अटक केली आहे. त्यास न्यायालयात हजर केले असता, २ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?
शहरातील दिक्षीतवाडी येथील विनायक दामू जाधव याने १२ ऑक्टोबर २०१९ रेाजी जिल्हापेठ पेालिस ठाण्यात तक्रार दिली. त्यात नमूद केल्याप्रमाणे, योगेश सुधाकर पाटील, दीपक काशिराम सोनवणे (रा. पथराळे, ता. यावल), मंगेश दंगल बोरसे (रा. चैतन्य कॉलनी, वाघनगर, जळगाव) अशा तिघांनी संगनमत करुन जिल्हा रुग्णालयात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केली होती.

यात विनायक जाधवची दिडलाखात, धिरज सरपटे (८० हजार), दिनेश एकनाथ पाटील(१ लाख १५ हजार), गौतम शिवचरण चव्हाण (८० हजार), अजय राजेंद्र खेडकर (८० हजार), रुपेश प्रेमचंद्र पाटील (१ लाख ३० हजार), राकेश भागवत कोळी (१ लाख ३० हजार) यांच्यासह इतर बेरोजगार तरुणांची फसवणूक प्रकरणी जिल्हापेठ पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

संशयित दीपक सोनवणे याला १७ सप्टेंबर रेाजी तर मंगेश बोरसे याला २१ सप्टेंबर रेाजी अटक करण्यात आली. दोघेही न्यायालयीन कोठडीत आहेत. गुन्ह्यातील प्रमुख संशयीत योगेश सुधाकर पाटील याला अंकलेश्वर येथून अटक करून रविवारी जिल्हा न्यायालयात हजर केले असता त्याला २ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी मिळाली.