जळगाव ::> जिल्ह्यात ५ ऑक्टोबरपासून हॉटेल्स, रेस्टॉरंट व बार सुरू करण्यास शासनाने परवानगी दिलेली होती. त्यानुसार हॉटेल्स, बार सुरूही झाले. मात्र, त्याची वेळ ठरवून देण्यात आलेली नव्हती. अखेर बुधवारी राज्याच्या पर्यटन विभागाने वेळ ठरवून दिल्यानंतर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी या सेवा सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत जास्तीत जास्त ५० टक्के क्षमतेसह सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार ऑक्सिजन पातळी ९५ पेक्षा कमी, तापमान ३८ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त व ताप असलेल्या रुग्णांना प्रवेश देण्यात येणार नाही. त्याचबरोबर स्वच्छता व सुरक्षिततेबाबत नियमावली ठरवून दिली आहे.
दरम्यान, हॉटेलमधील सर्व कामगार, कर्मचाऱ्यांनाही मास्क लावणे बंधनकारक असेल. ग्राहकांना हॅन्ड सॅनिटायझर उपलब्ध करून द्यावे. ग्राहकाकडून डिजिटल पेमेट घ्यावे. रोख रक्कम घेताना आवश्यक खबरदारी घेणे, कॅश काउंटरच्या ठिकाणी फ्लेक्झिग्लास स्क्रीनचा वापर, शक्य झाल्यास स्वतंत्र प्रवेश व निर्गमनाची व्यवस्था, पार्सल सुविधा पुरवताना ग्राहकाची स्वाक्षरी न घेता पार्सलच्या फोटोचा वापर, कापडी रुमालाऐवजी डिस्पोजेबल पेपर नॅपकीनचा वापर, दोन टेबलमध्ये १ मीटरचे अंतर ठेवावे.
सर्व हॉटेल्स, रेस्टारंट व बार आस्थापनांनी कामगार, कर्मचाऱ्यांची कोविड चाचणी करून घ्यावी. परिसराचे किमान दोन वेळा निर्जंतुकीकरण करावे. मेनूकार्डमध्ये शिजलेल्या पदार्थांचा समावेश करावा. रॉ, कोल्ड फूड, सलाडचा समावेश करू नये. हॉटेलमधील किचनमध्येच खाद्यपदार्थ तयार करावे.
बाहेरील विक्रेत्यांकडून खाद्यपदार्थ घेऊ नयेत. कफ, सर्दी, ताप लक्षणे असलेल्या कर्मचाऱ्यांची स्वतंत्र नोंदवही ठेवावी. सोशल डिस्टन्सिंगचा वापर करावा. एखाद्या कर्मचाऱ्यास श्वास घेण्यास त्रास होत असल्यास त्याने तत्काळ काम बंद करावे आदी सूचना देण्यात आल्या आहेत.
प्रवेशद्वारावरच तपासणी….प्रवेशद्वाराजवळ प्रवेश करणाऱ्या प्रत्येक ग्राहकाचे थर्मल गनच्या साहाय्याने तापमान मोजण्यात येईल. प्रवेश करणाऱ्या ग्राहकाचे पल्स ऑक्सिमीटरच्या साहाय्याने ऑक्सिजन पातळी मोजण्यात येईल. त्यानंतर ग्राहकाचे बोट सॅनिटराइज करून द्यावे.