दुचाकी चोर बंटी-बबली पोलिसांच्या गजाआड चोरीची वाहने विकून करायचे मौजमजा!

Jalgaon क्राईम जळगाव

जळगाव रजनीकांत पाटील प्रतिनिधी >> हिंदी चित्रपट बंटी-बबलीच्या कथानकाप्रमाणे सिनेस्टाईल पध्दतीने संपूर्ण जिल्ह्यात दुचाकी चोरी करणार्‍या निवृत्ती उर्फ छोटु सुकलाल माळी (वय ४८, रा.मोठा माळी वाडा, धरणगाव) व हेमलता देविदास पाटील (वय३४,व्हाईट बिल्डींग, खडडा जीन समोर रा.अमळनेर) या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने अंत्यंत नियोजनबध्द पध्दतीने तपास पूर्ण करुन ताब्यात घेतले आहे.

या जोडीने जिल्ह्यात विविध ठिकाणांहून २५ दुचाकी चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. ताब्यात घेतल्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तीन दिवसात या सर्व २५ दुचाकी हस्तगत केल्या आहेत. दोघांना एरंडोल येथील दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात वर्ग करण्यात आहे. न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दुचाकीचोर जोडीला २३ जुलै पर्यंत दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.


जळगाव जिल्हयातील मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणणे कामी पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अप्पर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नेटके, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गोरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापु रेहम यांना पथके स्थापन करणे कामी सुचना व मार्गदर्शन केले होते. त्याअनुषंगाने पोलीस निरीक्षक बापू रेहम यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार अशोक महाजन,पोहेकॉ संजय सपकाळे, सुधाकर अंभोरे ,अश्रफ शेख, दत्तात्रय बडगुजर, विनायक पाटील , किरण चौधरी, महेश महाजन, पल्लवी मोरे, वैशाली पाटील, पोहेकॉ राजु पवार, इंद्रीस पठाण तसेच स.फौ. विजय पाटील, नरेंद्र वारुळे यांच्या पथकाला रवाना केले होते.


१०० रुपयांच्या स्टॅम्पवर विकायचे दुचाकी
पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय सपकाळे, सुधाकर अंभोरे,अश्रफ शेख यांना गोपनिय माहिती मिळाली की, अमळनेर शहरातील एक महिला व धरणगाव शहरातील एक पुरुष हे सोबत जळगाव जिल्हयात फिरुन मोटार सायकली चोरी करीत आहेत व चोरलेल्या मोटार सायकली हया ग्राहकांना १०० रुपयाचे स्टॅम्प पेपरवर लिहुन देत आहेत. त्या अनुषगांने पोहेकॉ संजय सपकाळे, सुधाकर अंभोरे, अश्रफ शेख हे सतत तीन ते चार दिवस या चोरी करणार्‍या जोडीच्या मागे राहुन ते कश्या प्रकारे चोरी करतात या बाबत माहिती संकलीत करुन निवृत्ती उर्फ छोटु माळी व हेमलता देविदास पाटील या दोघांच्या जोडीला ताब्यात घेतले.


हेमलता चोरायची दुचाकी, निवृत्ती ठेवायचा लक्ष
जोडीपैकी हेमलता हिची पुरूषाप्रमाणे हेअरस्टाईल आहे. कुणालाही संशय येवून नये म्हणून पुरुषाच्या पोषाखात हेमलता स्वतः दुचाकी चोरी करते वेळी निवृत्ती माळी हा सुमारे १० ते १५ फुट अंतरावर उभा राहून गाडीचे मालकावर लक्ष ठेवायचा. यानंतर मास्टर चाबीच्या सहाय्याने लॉक उघडून सदर महिला दुचाकी घेऊन पसार व्हायची. ही महिला कोणत्याही प्रकारच्या मोटार सायकल सुसाट वेगाने चालविण्यात पारंगत आहे. पुरुषाचे कपडे परिधान केल्यामुळे हेमलता हिस गाडी चालविणे सोपे जात होते व यातील निवृत्ती हा त्या महिलेच्या मागे बसायचा अशी माहिती समोर आली आहे. सतत तीन दिवसाच्या कामगिरीत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोघांच्या जोडीने जिल्हाभरात ठिकठिकाणी विकलेल्या बजाज प्लॅटिना – ०३ , हिरो पॅशन प्रो – १० , हिरो स्ल्पेंडर –०४ , हिरो डिलक्स् –०५ ,होंडा शाईन – ०२, बजाज सीटी – ०१अश्या एकुण २५ दुचाकी हस्तगत केल्या आहेत. संशयित दोघांच्या जोडीला एरंडोल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. दोघांना न्यायालयात हजर केले असता दोघांना २३ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.


कशी जमली बंटी अन् बबलीची जोडी
हेमलता हिचा दहा वर्षापूर्वी घटस्फोट झाला आहे. तिला १५ वर्षाचा मुलगा आहे. आई वडील तसेच मुलगा यांच्यासोबत ती अमळनेरात वास्तव्यास आहे. तर निवृत्ती हा सुध्दा विवाहित असून त्यालाही दोन मुले आहेत. घटस्फोटानंतर हेमलता मुलीसोबत असलेल्या समलिंगी प्रकरणात पोलीस ठाण्यापर्यंत पोहचली. या प्रकरणात निवृत्ती याने तिला मदत केली, त्यातून बाहेर काढले होते. यानंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. प्रेमातून प्रेमसंबंध बहरले. दोघांनाही दारुचे व्यसने आहेत. व्यसने पूर्ण करुन मौजमजा करण्यासाठी प्रेमसंबंधात दोघांनी दुचाकीचोरीचा मार्ग पत्करला. पाच ते सहा वर्षापासून दोघेही एकत्र दुचाकी चोरी करायचे. दुचाकी विक्री करुन मिळेल त्या पैशांत मौज करत असल्याचे समोर आले आहे. दुचाकी चोरली की त्याच दिवशी ओळखीतून विकायचे. यानंतर निवृत्ती हेमलता हिस अमळनेर येथे तिच्या घरी सोडायचा व धरणगावला घरी जायचा.


स्टॅम्पवर गाड्या खरेदी करणारेही ठरतील आरोपी
या प्रकरणात सन १८६० चे कलम ४११अन्वये गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. सदर गुन्हयात कोणतीही चोरीची मालमत्ता, ती चोरीची मालमत्ता आहे हे माहित असतांना किंवा तसे समजण्याला कारण असतांना जो कोणी अप्रामाणिकपणाने ती स्वीकारील किंवा ठेवुन घेईल त्याला,तीन वर्षे असु शकेल इतक्या मुदतीची कारावासाची किंवा द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील. सदरच्या गुन्ह्यात स्टॅम्पवर गाडी खरेदी करणार्‍या २५ जणांनाही आरोपी करण्यात येणार असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक बापू रोहम यांनी सांगितले. तसेच कोणतेही वाहन खरेदी करतांना / व्यवहार करतांना त्या वाहनाचे मुळ कागदपत्रे पाहुन मालकाबाबत खात्री करुनच सदर वाहन विकत घ्यावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *