जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरची राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या

आत्महत्या क्राईम जळगाव जळगाव जिल्हा


जळगाव >> जिल्हा रुग्णालयात नोकरीवर असलेल्या एका डॉक्टरने महाबळ येथील राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी सकाळी ११ वाजता उघड झाली.

डॉ. विद्याधर लीलाधर पाटील (वय ३८, रा. महाबळ, मूळ रा. नांदेड, ता. धरणगाव) असे मृत डॉक्टरचे नाव आहे. ते बीव्हीजीच्या रुग्णवाहिकेवर कामावर होते. त्यानंतर कोविडचा प्रादुर्भाव झाल्यापासून ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात काम करीत होते. त्यांची पत्नी नागपूर येथे नोकरीला आहे. त्या नागपूर येथे होत्या.

गुरुवारी सकाळी ११ वाजेपासून डॉ. पाटील यांचा मोबाइल बंद होता. त्यामुळे त्यांचे वडील लीलाधर पाटील हे चिंतेत होते. मुलाशी संपर्क होत नसल्याने त्यांना शंका आली. त्यांनी जळगाव येथील त्यांचा भाचा पराग भंगाळे यांच्याशी संपर्क साधला.

लीलाधर पाटील भंगाळेंसह महाबळ येथे डॉ. पाटील हे राहत असलेल्या घरी गेले दरवाजा ठोठावल्यानंतरही उघडला नाही. त्यामुळे दोघांनी घराच्या मागच्या खिडकीतून डोकावून बघितले. त्या वेळी त्यांना किचनमध्ये डॉ. पाटील यांनी गळफास घेतला असल्याचे उघड झाले.

रामानंदनगर पोलिसांनी दरवाजा तोडून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी शासकीय रुग्णालयात नेला. त्यानंतर तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.