भाजपाच्या बैठकीसाठी खा.रक्षा खडसेंच्या गैरहजेरीमुळे जिल्ह्यात चर्चेला उधाण

Jalgaon Politicalकट्टा कट्टा जळगाव

रिड जळगाव टीम ::> खासदार रक्षा खडसे रात्री पक्षाच्या बैठकीसाठी दिल्लीला गेल्या आहेत. पक्षाची परवानगी घेऊनच त्या दिल्लीला गेल्या. त्यांच्या अनुपस्थितीबाबत तर्कवितर्क लढवणे चुकीचे असल्याचे गिरीश महाजन म्हणाले. तसेच एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादीत प्रवेशानंतर काहीही परिणाम होणार नसल्याचा दावा त्यांनी केला. भाजप हा पक्ष विचारांवर चालणारा पक्ष आहे. पक्षसंघटन मजबूत करण्यासंदर्भात चाचपणी सुरू असल्याचे महाजन यांनी सांगितले.

माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश केला. खडसेंच्या पक्षत्यागाचा मोठा फटका बसण्याची शक्यता लक्षात घेता जिल्हा भाजप कोअर कमिटीची तातडीची बैठक मंगळवारी दुपारी झाली.

तालुकानिहाय आढावा बैठकीदरम्यान नेत्यांना कार्यकर्त्यांच्या आक्रमक स्वभावाचा सामना करावा लागला. संघटन बळकटीसाठी अभ्यास वर्गाची कार्यकर्त्यांना गरज नसून, नेत्यांना आवश्यकता आहे. जुन्या कार्यकर्त्यांशी पक्षाचा संवाद तुटला आहे. तो पुन्हा स्थापित होईल, तेव्हाच डॅमेज कंट्रोल शक्य असल्याचे खडे बोल सुनावल्याने ही बैठक चर्चेचा विषय ठरली.

भाजपचे ज्येष्ठ नेते खडसेंनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर त्यांच्यासोबत कोण कोण पक्ष सोडणार याची सध्या चर्चा सुरू आहे. खडसेंच्या पक्षत्यागाचा पक्षाला फटका बसू नये म्हणून पक्षाच्या वतीने डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यादृष्टीने भाजपच्या कोअर कमिटीच्या वतीने तातडीने मंगळवारी बैठकीचे आयोजन केले होते.

प्रदेश संघटक विजय पुराणिक, माजी मंत्री गिरीश महाजन, खासदार उन्मेष पाटील, आमदार सुरेश भोळे, संजय सावकारे, मंगेश चव्हाण, चंदुलाल पटेल, माजी आमदार स्मिता वाघ, विभागीय संघटनमंत्री किशोर काळकर, महापौर भारती सोनवणे, जि.प.अध्यक्षा रंजना पाटील, उपाध्यक्ष लालचंद पाटील आदींची उपस्थिती होती.