प्रतिनिधी ::> जळगाव मनपा एकहाती सत्ता मिळवणाऱ्या भाजपमध्ये पक्षांतर्गत कलह वाढला आहे. पक्षात बाहेरून आलेले आणि मूळ निवासी असे गट सक्रिय झाले आहेत. पक्षातील आधीच जोरावर असलेली गटबाजी आणि त्यात वाढलेल्या कलहामुळे पक्षाचे नेते त्रस्त झाले आहेत. यासंदर्भात शहराची जबाबदारी असलेल्या माजी मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून पक्षात तंटामुक्ती अभियान हाती घेतल्याची माहिती पुढे आली आहे.
शहर विधानसभा मतदारसंघ आणि शहर महापालिकेत सत्तेत असलेल्या भाजप पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून राजकीय कोंडीत पकडण्यात आलेले आहे. त्यातच पक्षांतर्गत राजकीय संघर्ष शिगेला पोहोचला आहे. पक्षांतर्गत बाबींची माहिती विरोधकांच्या हाती लागत असल्याने पक्षाच्या शहरातील स्थानिक नेत्यांनी अनेकांवर संशयाची सुई उगारली. त्यातूनही अनेक लोक दुखावले आहेत. मूळ पदाधिकारी, कार्यकर्ते आणि आयात केलेले असे दोन गट पडले आहेत. राजकीय संघर्ष मिटवणे आवश्यक असल्याने गिरीश महाजन यांनी शहरात लक्ष घातले आहे.