जळगाव प्रतिनिधी >> एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचे चक्क आतमध्ये सिगारेट ओढून धुराच्या अलार्मजवळ नेली. त्यामुळे एटीएम केंद्रात धूर झाल्यानंतर नागरिकांनी या तरुणास ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन केले.
पवन रवींद्र लोखंडे (वय २९, रा. गजानन कॉलनी) असे या तरुणाचे नाव आहे. पवन हा गुरुवारी दुपारी ३.३० वाजता गणेश कॉलनीतील एका एटीएम केंद्रात गेला होता.
सुरुवातीला त्याने पैसे काढण्याचा प्रयत्न केला. पैसे न निघाल्यामुळे त्याने आतमध्येच सिगारेट पेटवली. त्यानंतर ही सिगारेट धुराच्या अलार्मजवळ नेल्याने एटीएम केंद्रात धूर होऊन सायरन वाजू लागला.
त्यामुळे बाहेर उभ्या असलेल्या नागरिकांनी पवनला ताब्यात घेऊन जिल्हापेठ पोलिसांना बोलावून पवनला त्यांच्या स्वाधीन केले. पवनने खोडसाळपणा करीत हे कृत्य केल्याचे पोलिसांना सांगितले. त्यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली आहे. एटीएमचे नुकसान प्रकरणी पवनच्या विरुद्ध कारवाई करण्यात आली.