पारोळा >> बहिणीसोबत प्रेम संबंधाच्या संशयावरून संतप्त झालेल्या भावाने एका तरुणावर भर चौकात ब्लेडने वार केले. शुक्रवारी दुपारी ४ वाजता पारोळा शहरातील गणेश इलेक्ट्रिकल पुढील शिरोडे प्रोव्हिजनसमोर ही घटना झाली. ब्लेडने वार केल्याने जखमी झालेल्या तरुणावर धुळे येथे उपचार सुरू आहेत. दरम्यान, ही माहिती मिळताच पोलिसांनी तासाभरात संशयित अजय चौधरी याला जुलामपुरा भागातून ताब्यात घेतले.
याप्रकरणी सुरेश यादव पाटील (रा.तलाव गल्ली) यांनी पारोळा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार त्यांचा मुलगा नितीन यादव पाटील हा शुक्रवारी (दि.४) दुपारी दुचाकीने (एमएच.१९-बी.६६०५) शेतातून घरी येत होता. गणेश इलेक्ट्रिकल्सच्या पुढे शिरोडे प्रोव्हिजनसमोर अजय रवींद्र चौधरी (रा.जुलामपुरा, दल परिसर) याने नितीनच्या गळ्यावर ब्लेडने वार केले.

बहिणीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून अजयने नितीनवर हा हल्ला केला. त्यात रक्तबंबाळ होऊन नितीन दुचाकीवरून खाली पडला. या घटनेमुळे बाजारपेठेसह तलाव गल्लीत खळबळ उडाली. नितीनवर ब्लेडने वार केल्यानंतर अजय चौधरी याने घटनास्थळावरून पळ काढला. तर तलाव गल्लीतील युवकांनी गंभीर जखमी नितीनला तातडीने पारोळा कुटीर रुग्णालयात नेले. तेथे प्राथमिक उपचार करून त्याला धुळे येथे हलवण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार दोघांमध्ये यापूर्वी देखील अनेकदा वादविवाद झाले होते. शुक्रवारी ब्लेडने हल्ला झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी अवघ्या एक तासात संशयित अजय चौधरी यास तो राहत असलेल्या जुलामपुरा परिसरातून ताब्यात घेतले. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली. याप्रकरणी सुरेश पाटील यांच्या फिर्यादीवरून अजय चौधरीविरूद्ध भादंवी कलम ३०७ प्रमाणे गुन्हा दाखल झाला.