रिड जळगाव टीम ::> मागील महिन्यात भाजपातून राष्ट्रवादीत गेलेले ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यासह ९ नावांना राज्यपाल निर्देशित सदस्यांच्या नियुक्तीला हायकोर्टात आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
कला किंवा सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींच्या नियुक्तीचे निकष असताना राजकीय नेत्यांची वर्णी लावल्याचा दोष ठेवत दोघा सामाजिक कार्यकर्त्यांनी हायकोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत.
यामध्ये एकनाथ खडसे, राजू शेट्टी यांच्यासह राजू भिंगे, रजनी पाटील, सचिन सावंत, सय्यद मुजफ्फर हुसेन, विजय करंजकर, चंद्रकांत रघुवंशी या आठ जणांना याचिकेत प्रतिवादी करण्यात आलं आहे.
खडसे-शेट्टी यांच्यासह आठही जणांची राज्यपाल नियुक्त आमदारकीच्या कोट्यातून विधान परिषदेवर नियुक्ती करण्याला या याचिकेतून विरोध करण्यात आला आहे.
मात्र या नियुक्त्या करताना शिक्षण, कला, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींची नियुक्ती करावी, अशी प्रथा आहे.
परंतु या क्षेत्रातील व्यक्तींची निवड न करता राजकीय व्यक्तींची नियुक्ती केली जात असते. याबाबत सामाजिक कार्यकर्ते दिलीप आवळे आणि शिवाजी पाटील यांनी काही दिवसांपूर्वी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.