वडिलांच्या अंत्यविधीनंतर तिन्ही भावांनी केले मतदान

निवडणूक रावेर

ऐनपूर >> येथील रहिवासी सुखदेव वामन महाजन (वय ७९) यांचे गुरुवारी रात्री हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्यावर शुक्रवारी दुपारी अंत्यसंस्कार झाले. या दु:खाच्या प्रसंगातही त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी अंत्यविधीनंतर मतदान केले. त्यात त्यांच्या तिन्ही मुलांचाही समावेश होता. वाॅर्ड क्रमांक तीनमध्ये असलेल्या या मतदारांनी लोकशाहीचा आदर करत मतदानाला प्राधान्य दिले
.
दु:खातही स्व.महाजन यांच्या पत्नी, तीन मुले, तीन सुना त्यांचे चार भाऊ यांनी मतदान केले. ऐनपूर ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत शुक्रवारी मतदान झाले. गावातील ५ हजार ५६५ पैकी ४ हजार ८२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण ७३.३५ % मतदान झाले. ग्रामपंचायत निवडणुकीत विद्यमान सरपंचांसह चार ग्रामपंचायत सदस्य, चार माजी ग्रामपंचायत सदस्य निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. ऐनपूरची एक जागा बिनविरोध असून एकूण १४ जागांसाठी ४२ उमेदवारांमध्ये लढत आहे. मातब्बर उमेदवारांसमोर यावेळेस नवयुवकांचे आव्हान आहे. किरकोळ अपवाद वगळता शुक्रवारी मतदानाची प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली.