बनावट नंबर प्लेटची मोटारसायकल वापरणाऱ्या भुसावळातील तिघांना अटक

क्राईम निषेध पाेलिस भुसावळ

भुसावळ प्रतिनिधी >> भुसावळातील चोरलेली मोटारसायकल बनावट नंबरने वापरून बेवारस स्थितीत सोडून देणाऱ्या तीन मोटरसायकल चोरांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.

८ ते १० महिन्यांपूर्वी तालुक्यातील तळवेल गाव शिवारातून मोटरसायकल क्रमांक (एम.एच १९, सी.एच. ४४२६) ही चोरीला गेली होती. याबाबत वरणगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल होता.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भुसावळातील न्यु आंबेडकर नगर येथे एका संशयितास पकडून विचारपूस केली. पोलीस चौकशीत त्याने त्याचे नाव आदर्श बाळू तायडे उर्फ गोल्डन डप्ली (वय-२३,रा.न्यू आंबेडकर नगर, चांदमारी, भुसावळ) असे सांगितले.

संशयिताची कसून चौकशी केली असता त्याने कबूल केले की, एक वर्षापूर्वी तळवेल गाव शिवारातून त्याने आणि त्याचा साथीदार सागर बबन मुसळे (रा.कंडारी) तसेच अलीम शेख अखिल (वय-१९,रा.कंडारी) अशा तिघांनी मिळून चोरी केली होती. त्यानंतर या मोटरसायकलची मूळ नंबर प्लेट बदलून त्यावर (एम.एच.१९,सी.एस. ८५६५) असा नंबर बदली केला होता.

तसेच त्यानंतर साधारण तीन ते चार महिन्यापूर्वी भुसावळातमधील लाइफ केअर हॉस्पिटलमध्ये रात्री ही मोटरसायकल बेवारस स्थितीत सोडून निघून गेले होते. दरम्यान याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तिघां आरोपींना अटक केली असून पुढील कारवाईसाठी वरणगाव पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.