रिड जळगाव प्रतिनिधी :> सातपुड्याच्या पायथ्याशी शिरपूर तालुक्यातील गुऱ्हाळपाणी हे महाराष्ट्रातील सर्वात शेवटचे गाव आहे. या भागाला नैसर्गिक सौंदर्य लाभले आहे.
या भागातील पाड्यांमध्ये गेल्या आठवड्यात मराठी चित्रपट दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांनी पाच दिवस मुक्काम केला. या काळात त्यांनी आदिवासी जीवनशैली अनुभवली. या अनुभवातून भविष्यात चित्रपट निर्मिती किंवा लघुपट तयार करण्याचा निश्चय करून ते मार्गस्थ झाले.
शिरपूर तालुक्यातील गुऱ्हाळपाणी, थुवानपाणी, निशानपाणी, प्रधानदेवी पाडा, कडईपाणी हे गाव पाडे अत्यंत दुर्गम भागात आहेत. काही ठिकाणी जाण्यासाठी धड रस्ताही नाही. या भागातील आदिवासी शेती, ऊसतोड आणि मोळी विकून उदरनिर्वाह करतात.
सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या या पाड्यांमध्ये निसर्ग संपदाही अफाट आहे. पावसाळ्यात हिरवाईने नटलेल्या टेकड्या आणि वाहणाऱ्या झऱ्यांची कुणालाही भुरळ पडेल अशी स्थिती आहे.
यंग फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी या परिसराचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल केल्यानंतर देऊळ, वळू, विहीर, हायवे आदी चित्रपटांचे दिग्दर्शक उमेश कुलकर्णी थेट गुऱ्हाळपाणी गावात आले. त्यांनी पाच दिवस या भागात मुक्काम केला.
तसेच परिसरातील दहा पाड्यांमध्ये राहणाऱ्या आदिवासींची जीवनशैली, सांस्कृतिक परंपरा, वेशभूषा, खाद्य संस्कृती, पारंपरिक गीते, आदिवासींच्या समस्या, मोळी विकणाऱ्या महिलांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर त्यांनी या भागातील जीवनशैलीवर चित्रपट तयार करण्याचा विचार बोलून दाखवला. तसेच नोव्हेंबर महिन्यात पुन्हा टीमसह गुऱ्हाळपाणीत येण्याचा संकल्प केला. त्या वेळी ते एक डॉक्युमेंट्री तयार करणार आहे.
दिला मदतीचा हात
उमेश कुलकर्णी या ठिकाणी वास्तव्यास असताना त्यांनी आदिवासींच्या गरजा ओळखून त्यांना मदतीचा हात पुढे केला. यंग फाउंडेशनच्या मदतीने उमेश कुलकर्णी यांनी आदिवासी परिवारांना अन्नधान्याचे वाटप केले.