तिहेरी अपघातात कंटेनरवर ट्रक अन् ट्रकवर कंटेनर आदळला; चालक ठार

अपघात क्राईम धुळे माझं खान्देश

धुळे प्रतिनिधी >> तालुक्यातील पुरमेपाडा शिवारात भरधाव वेगातील ट्रक उभ्या कंटेनरवर आदळला. त्याचवेळी मागून येणाऱ्या कंटेनरने अपघातग्रस्त ट्रकला धडक दिली. या तिहेरी अपघातात एक जण ठार झाला. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही वेळेसाठी ठप्प झाली होती. याप्रकरणी धुळे तालुका पोलिस ठाण्यात नोंद करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.

पुरमेपाडा शिवारात असलेल्या एका हॉटेलपासून काही अंतरावर कंटेनर उभा होता. रात्रीच्या वेळी भरधाव वेगाने येणारा ट्रक उभ्या कंटेरनरवर आदळला. या ट्रकच्या मागे असलेला अन्य एका कंटेनरमधील चालकही वेगावर नियंत्रण मिळवू शकला नाही. त्यामुळे अपघातग्रस्त ट्रकवर हा कंटेनर धडकला.

या घटनेत सर्वात मागे असलेल्या कंटेनरमधील चालक ठार झाला. तसेच त्याच्यासोबत असलेला सहकारी गंभीर जखमी झाला. रस्त्यावर उभा असलेला कंटेनर सलग दोन धक्क्यामुळे रस्त्याच्या बाजूला उलटला. रात्रीच्या वेळी हा अपघात झाला. मृत चालक व जखमी सहचालकांची ओळख पटू शकली नाही.

अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. धुळे तालुका पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वाहतूक सुरळीत करण्यासह जखमी तरुणाला हिरे रुग्णालयात पाठवले. या प्रकरणी धुळे तालुका पोलिस ठाण्यात नोंद करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.