खडसेंच्या पक्षांतराची चर्चा अन् राजकीय हालचाली गतिमान

Politicalकट्टा कट्टा धुळे माझं खान्देश

धुळे प्रतिनिधी ::> भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे पक्षांतर करणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू असून, धुळे जिल्ह्यातही राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अनेकांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. खडसे यांनी पक्षांतर केले तर धुळे जिल्ह्यातून त्यांच्यासोबत कोण-कोण पक्षांतर करेल याकडे सर्वांचे लक्ष लागले असून, त्याबाबत चर्चाही रंगू लागल्या आहेत.

खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू झाली आहे. धुळे जिल्ह्यात त्यांना मानणारा मोठा वर्ग भाजपत आहे. त्यामुळे खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला तर त्यांच्यासोबत कोण कोण पक्षांतर करेल याविषयी आता चर्चा सुरू झाली आहे. त्यादृष्टीने काही जणांनी चाचपणी सुरू केली आहे.

शिवसेनेचे माजी आमदार शरद पाटील यांनी निवडणुकीनंतर राष्ट्रवादीत गेलेले अनिल गोटे यांच्याबद्दल असलेले गैरसमज चर्चेतून दूर झाल्याचे सांगत राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे संकेत दिले आहेत. दोंडाईचा येथील रावल गटाचे विरोधक राष्ट्रवादीचे अॅड. एकनाथ भावसार यांनीही नुकतीच खडसे यांची भेट घेतली. जिल्ह्यातील अजून काही जण पक्षांतर करण्याची शक्यता आहे.

गाठीभेटीवर भर…
एकनाथ खडसे यांना मानणाऱ्या जिल्ह्यातील समर्थकांची गुप्त बैठक राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याच्या शेतात झाल्याची चर्चा गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू आहे. त्या बैठकीला एकनाथ खडसे यांचे मानसपुत्र मानले जाणारे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील नेरकर व इतर काही जण उपस्थित होते. त्यानंतर एकनाथ खडसे यांच्या पक्षांतरच्या चर्चेला उधाण आले असताना गेल्या गुरुवारी नेरकर यांनी भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांच्या कार्यालयात जाऊन त्यांच्याशी एक तास चर्चा केली.

त्या ऑफरची शहरात चर्चा…
पंधरा दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अनिल गोटे आणि भाजपचे अनुप अग्रवाल यांच्यात पत्रकयुद्ध रंगले होते. त्यात अनिल गोटे यांनी मनपातही सत्तांतराबाबत संकेत दिले. त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी एक पत्रक काढले. एकूणच या घडामोडीत एका बड्या नेत्याकडून मनपातील पदाधिकाऱ्याला अमूक रक्कम घे आणि नगरसेवक घेऊन ये अशी ऑफर दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे ही ऑफर नेमकी कोणी, कोणाला दिली याबाबत राजकीय क्षेत्रात वेगवेगळे अंदाज बांधले जात असून चर्चा रंगत आहे.