मुलीवर अत्याचार करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात यावी

क्राईम धुळे माझं खान्देश

अामदार फारुख शाह यांनी गृहमंत्र्यांकडे केली मागणी

धुळे प्रतिनिधी ::> हिंगोली शहरात एकाने तंबाखू आणण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीला घरात बोलावून तिच्यावर अत्याचार केले. या घटनेतील दोषीला तत्काळ अटक करून कठोरातील कठोर शासन करण्यात यावे, अशी मागणी आमदार फारुख शाह यांनी गृहमंत्र्यांकडे केली आहे.

हिंगोली शहरात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली. ३१ ऑगस्ट रोजी शहरातील मस्तान शाह नगर या भागात ७ वर्षीय अल्पवयीन मुलीला तंबाखू आणण्याच्या बहाण्याने घरामध्ये बोलावून तिचे लैंगिक शोषण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. या घटनेतील दोषी आलिम खान ताज खान पठाण, रा. मस्तान शाह नगर या नराधमाविरोधात बलात्कार आणि बाललैंगिक अधिनियमानुसार हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यानंतर एक महिना उलटला तरी अद्यापपर्यंत दोषीला अटक करण्यात आलेली नाही. घडलेली घटना अतिशय गंभीर असल्यामुळे आरोपीला तत्काळ अटक करून हा खटला जलदगती न्यायालयात चालवून नराधमाला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी आमदार शाह यांनी केली आहे.

राज्य गुन्हेगारीत सातव्या क्रमांकावर जाऊन पोहाेचले अाहे. गुन्ह्यांमध्ये १९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यातही स्त्रियांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दरोडे, खून, चेनस्नॅचिंग, चोरी, बलात्काराचे प्रमाण वाढले आहे. गुन्हेगारांना कायद्याचा धाक आणि वचक बसण्यासाठी तत्काळ कठोर कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी यावेळी आमदार फारुख शाह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *