चाकूचा धाक दाखवत तिघांचा अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार

क्राईम धुळे निषेध माझं खान्देश

धुळे >> तालुक्यातील न्याहळोद येथे माहेरी आलेल्या अल्पवयीन विवाहितेला चाकू, वस्तऱ्याचा धाक दाखवून तिघांनी तिच्यावर अत्याचार केला. लक्ष्मण महाले, सचिन पवार, कांतिलाल पवार अशी तिघांची नावे आहेत.

या प्रकरणी सोनगीर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. तिघांची कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. पीडितेचा ऑगस्ट महिन्यात विवाह झाला होता.

न्याहळोद येथील माहेर असलेल्या मुलीचा अमळनेर तालुक्यातील चोपडाई कोंढावळ येथील तरुणाशी विवाह झाला आहे. ही विवाहिता १६ वर्षांची अल्पवयीन आहे.

घरी असताना गावातील लक्ष्मण भिवराज महाले, सचिन ज्ञानेश्वर पवार, कांतिलाल कैलास पवार यांनी चाकू व वस्तऱ्याचा धाक दाखवून मुलीचे अपहरण केले.

त्यानंतर जवळच असलेल्या नगाव व गोंदूर रस्त्यावरील शेतांमध्ये नेऊन तिघांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. हा प्रकार १८ नोव्हेंबरला सायंकाळी साडेसात ते साडेआठ वाजेदरम्यान घडला.

याबाबत पीडितने दिलेल्या तक्रारीवरून लक्ष्मण महाले (वय १९), सचिन पवार (वय २१), कांतिलाल पवार (वय २४) यांच्या विरोधात सोनगीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेनंतर पोलिसांनी रात्रीतून तिघांना अटक केली. त्यांना न्यायालयात उभे केल्यानंतर त्यांची कोठडीत रवानगी करण्यात आली असल्याची माहिती पोलिस प्रशासनाकडून देण्यात आली आहे. पोलिस अधिकारी प्रकाश पाटील तपास करत आहे.

तक्रारदार पीडितेचे वय १६ वर्षे २ महिने आहे. तीन महिन्यांपूर्वी तिचा विवाह झाला आहे. विवाहाच्या वेळी पीडितेचे वय १६ वर्षेही पूर्ण नव्हते.

शिवाय कायद्यानुसार मुलगी १८ वर्षाची असणे गरजेचे आहे. त्यामुळे पोलिस पीडितेचा जन्म दाखला तपासणार आहे.

ती अल्पवयीन आढळली तर तिचे पालक, सासरच्या मंडळीवर गुन्हा दाखल होऊ शकतो.