नाथाभाऊ अर्धसत्य सांगताहेत, त्यांनी मलाच व्हिलन ठरवलं : देवेंद्र फडणवीस

Aurangabad Politicalकट्टा कट्टा महाराष्ट्र

औरंगाबाद प्रतिनिधी ::> भाजपातून बाहेर पडताना ठपका ठेवण्यासाठी कुणाला तरी व्हिलन ठरवावं लागतं. त्याप्रमाणे एकनाथ खडसे यांनी मला लक्ष्य केल्याचे महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (२१ ऑक्टोंबर) औरंगाबाद येथे सांगितले.

खडसे यांच्यावर एका महिलेने विनयभंग केल्याचा आरोप सतत तीन दिवस केला. राज्यभर मोठी मीडिया ट्रायल झाली होती. त्यामुळे खडसे केवळ गुन्हा दाखल केल्याचे अर्धसत्य सांगत असल्याचे विरोधीपक्षनेते फडणवीस यांनी सांगितले.

भाजप फार मोठा पक्ष असून, कुणी आले आणि गेले तरी पक्षावर फारसा फरक पडत नाही. नाथाभाऊ पक्ष सोडून जात असल्याने वाईट वाटले. त्यांचा माझ्याबद्दल राग होता तर त्यांनी वरिष्ठांकडे तक्रार करायची होती.

जळगाव जिल्हा हा नेहमी भाजपच्या पाठीशी राहिलेला आहे. पक्षाचे मोठे काम जिल्ह्यात असून, खडसे यांच्यासोबत एकही आमदार जाणार नसल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

माजी राज्यमंत्री अर्जून खोतकर व जळगाव जिल्ह्यातील मंत्री गुलाबराव पाटील यांनी पंकजा मुंडे यांना शिवसेनेत येण्याची ऑफर दिली असल्याचे फडणवीस यांना विचारले असता त्यांनी अशा ऑफरमध्ये काहीच दम नसल्याचे सांगितले.अर्जून खोतकर यांचेच काही खरे नाही. त्यामुळे त्यांनी दिलेली ऑफर कोण गंभीरपणे घेत नसल्याचा टोलाही हाणला.

नाथाभाऊंचा राजीनामा दुर्दैवी असून त्यांची माझ्याबद्दल तक्रार होती तर त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे बोलणे गरजेचे होते. पक्षातील लहान कार्यकर्ता जरी पक्ष सोडून गेला तरी पक्षाचे नुकसान होते असे सांगतानाच त्यांनी भाजपमध्ये खूप लोक येतात आणि जातात. त्याचा पक्षाला फरक पडत नसल्याचेही सांगून टाकले. खडसे यांनी केलेल्या आरोपांचे उत्तर आपण योग्यवेळ आल्यानंतर देऊ, असेही ते म्हणाले.