एक दिवसाच्या अर्भकाला शेतात टाकून महिला पसार ; यावल तालुक्यातील घटना

किनगाव क्राईम यावल साकळी

किनगाव प्रतिनिधी >> यावल तालुक्यातील डांभुर्णी शिवारात जळगाव -धानोरा रस्त्यावर अज्ञात महिलेने एक दिवसाचे पुरूष जातीचे अर्भक रस्त्याच्या कडेला शेतात टाकून दिल्याची घटना रविवारी दुपारी उघडकीस आली. मजुरांच्या सतर्कतेमुळे या बाळाला यावल ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. तेथून अर्भकाला जळगावला नेले आहे.

रविवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास डांभुर्णी शिवारात नितीन फालक यांच्या गट क्रमांक ७८५ मधील शेतात हे अर्भक आढळले. दुपारी लाल रंगाची साडी परिधान केलेली महिला व पुरुष दुचाकीने त्या ठिकाणी आले होते. त्यांनी शेताच्या बांधावर अर्भकाला सोडून पळ काढला. हा प्रकार शेतमजूर इंदुबाई कोळी, पिक सरंक्षण सोसायटीचे रखवालदार देविदास सोळुंके यांनी पाहिला. त्यांनी डांभुर्णीचे पोलिस पाटील किरण कचरे यांना माहिती दिली.

पोलिसांच्या मदतीने अर्भकाला यावल ग्रामीण रूग्णालयात आणले. वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. बी. बारेला, अधिपरीचारिका नीलिमा पाटील, वाय. डी. चौधरी आदींनी उपचार केले. संगोपनाच्या दृष्टीने जळगाव हलवण्यात आले. या प्रकरणी पोलिस पाटील किरण कचरे यांच्या फिर्यादीवरून यावल पोलिसांत गुन्हा दाखल झाला. पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार तपास करत आहेत.