कारचालकाला मारहाण करत ३ लाख २९ हजार लुटले ; गुन्हा दाखल

क्राईम चोरी, लंपास पाचोरा

पाचोरा प्रतिनिधी >> कट मारुन पुढे जाणाऱ्या मालवाहू रिक्षाचालकास जाब विचारण्यासाठी कार चालकाने थांबवले. मात्र, रिक्षा चालकाने उलट त्यांनाच मारहाण करुन जवळपास ३ लाख २९ हजारांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना रविवारी रात्री बिल्दी फाट्याजवळ घडली. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील बाळद येथील मूळ रहिवासी व हल्ली जळगावातील खोटे नगरमध्ये राहणारे महेश शिवाजी सोमवंशी (वय ४७) हे २० रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास टाटा इंडिका कारने (एमएच- १९, एपी- १८३७) पाचोऱ्याहून जळगाव येत होते. बिल्दी फाट्याजवळ मागून येणाऱ्या टाटा मॅजिकने (एमएच-१९, बीयू- १६०९)त्यांच्या कारला कट मारला. यामुळे कारचा साईड ग्लास फुटला व काचाचे तुकडे महेश सोमवंशी यांच्या चेहऱ्यावर लागले. त्यामुळे सोमवंशी यांनी टाटा मॅजिकला थांबवून चालकाला जाब विचारला.

या गोष्टीचा राग येवून मॅजिक चालकाने महेश सोमवंशी यांना टणक वस्तूने मारहाण करुन त्यांच्या जवळील २ लाख ३ हजार रुपये रोख, १ लाख २० हजार रुपयांची तीन तोळ्याची सोन्याची साखळी व ६ हजार रुपये किंमतीचा मोबाइल हिसकावून पोबारा केला. महेश सोमवंशी यांच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिसांत अज्ञात रिक्षा वाहन चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.