अल्पवयीन मुलीवर नराधम बापाने केला अत्याचार, मुलगी सहा महिन्यांची गरोदर ; गुन्हा दाखल

क्राईम पारोळा

पारोळा प्रतिनिधी >> व्यसनाधीन बापाने आपल्या स्वत:च्या मुलीवर धमकी देत अत्याचार केला. यामुळे मुलगी सहा महिन्यांची गरोदर राहिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीवरून कन्हेरे येथील नराधम बापावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कन्हेरे येथील हा नराधम पिता आपली पत्नी, १ मुलगा व मुलीसह राहतो. सहा महिन्यांपूर्वी शालकाचे लग्न असल्याने त्याची पत्नी व मुलगा गावाला गेले होते. त्यावेळी मद्य प्राशन करून आलेल्या पित्याने पहिल्या रात्री आपल्या स्वत:च्या दहावीतील मुलीवर अत्याचार केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशीही पुन्हा धमकी देऊन अत्याचार केला. त्यानंतर पीडित मुलीची आई व भाऊ घरी आले. मात्र, धमकी मिळाल्याने मुलीने ही गोष्ट कुणालाच सांगितली नाही; परंतु त्या मुलीची मासिक पाळी न आल्याने तिला रुग्णालयात नेले. मात्र, अशक्तपणा व रक्त कमी असल्याने सांगून डॉक्टरांनी तिला औषधी दिली; परंतु औषधोपचार करूनही पाळी न आल्याने पुन्हा रुग्णालयात नेले असता ती मुलगी ६ महिन्यांची गरोदर असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून बापाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.